मांढरदेव यात्रेनिमित्त विश्वस्त, पुजारी यांच्या उपस्थितीत महापूजा

मांढरदेव यात्रेनिमित्त विश्वस्त, पुजारी यांच्या उपस्थितीत महापूजा

वाई : मांढरदेव येथे काळूबाईच्या यात्रेनिमित्त विश्वस्त व पुजारी यांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली. करोना पार्श्वभूमीवर यात्रेला बंदी असल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवत होता.

मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद होती. मांढरदेवीच्या यात्रेसाठी पौष महिन्यामध्ये दरवर्षी सात ते आठ लाख भाविक येतात. परंतु मांढरदेव परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याने व  यात्रा रद्द झाल्याने  प्रशासनाने भाविकांना १४ फेब्रुवारीपर्यंत  मांढरदेव येथे येण्यास बंदी घातली.  त्यामुळे आज मंदिर परिसरात भाविकांविना यात्रा संपन्न झाली. दरम्यान, काल रात्री देवीची मानाची पालखी मांढरदेव गावातून काळूबाई मंदिर परिसरात आणण्यात आली  व देवीचा जागर निवडक ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाला.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी

आज पहाटे देवीचा गोंधळ घालण्यात आला. सकाळी सहा वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक तथा जिल्हा प्रमुख न्यायाधीश  आर. डी. सावंत यांच्या हस्ते देवीची  विधिवत पूजा करण्यात आली.त्या वेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन एस. जी. नंदीमठ, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, उपविभागीय  पोलिस अधिकारी शीतल जानवे-खराडे,तहसीलदार रणजित भोसले, विश्वस्त अ‍ॅड. महेश कुलकर्णी, अतुल दोशी,  चंद्रकांत मांढरे, जीवन मांढरे, सुधाकर क्षीरसागर, शैलेंद्र क्षीरसागर, राजगुरू कोचळे, सचिव रामदास खामकर, सचिन लक्ष्मण चोपडे यांच्यासह निवडक पुजारी उपस्थित होते.

देवस्थान ट्रस्टच्यावतीने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे  काळूबाई  देवीचे मंदिर अतिशय सुंदर दिसत होते.  मांढरदेव परिसरात जमावबंदीचे आदेश दिल्याने पोलीस व प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. यात्रेला बंदी नाही असे समजून मांढरदेव येथे येणाऱ्या भाविकांना भोर येथे शिवाजी चौक व वाई एमआयडीसी त्याचबरोबर कोचळेवाडी फाटा येथे अडवून माघारी पाठवले जात आहे.

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

कोणत्याही परिस्थितीत भाविकांना मंदिराकडे सोडले जात नाही. भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी केले आहे.मंदिर परिसरात दुकाने थाटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, त्यामुळे मंदिर व यात्रा परिसरात मोठा शुकशुकाट व नित्य धावपळ गजबजाट थांबल्याचे जाणवत आहे.

मांढरगडावर व काळूबाई मंदिर परिसरात उपविभागीय पोलिस अधिकारी, वाईचे पोलिस निरीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली एक सहायक निरीक्षक, दहा उपनिरीक्षक, दंगा काबू पथक, जलद कृती दलाच्या तुकडीसह  मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.