मागोवा : मतांच्या ध्रुवीकरणामुळे दोघांनाही आशा

नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील प्रत्येकी तीन अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश धुळे लोकसभा मतदारसंघात आहे.

धुळे : मतांचे ध्रुवीकरण, मोदी, पाणी, शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयांभोवती शेवटपर्यंत प्रचार फिरलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव मध्य, बागलाण, धुळे शहर आणि धुळे ग्रामीण या विधानसभा मतदारसंघात वाढलेला मतटक्का निर्णायक ठरणार आहे. भाजपचे सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या शोभा बच्छाव या दोन डॉक्टरांमधील लढत चुरशीची झाली आहे. तिसरा प्रबळ उमेदवार नसल्याने सरळ लढतीत मतदारांचे काम अधिक सोपे झाले.

हे वाचले का?  Rohit Pawar on Narendra Modi: “भटकत्या आत्म्याची भीती अजूनही…”, रोहित पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, “महाराष्ट्रात येणं…”!

नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील प्रत्येकी तीन अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश धुळे लोकसभा मतदारसंघात आहे. यापैकी सर्वाधिक मतदान झालेल्या मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमचे वर्चस्व आहे. याशिवाय वाढीव मतदान झालेल्या धुळे शहरात एमआयएम, धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. शिंदे गटाचे आमदार असलेल्या मालेगाव बाह्यमध्ये तुलनेत कमी मतदान झाले आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या.

हे वाचले का?  Sanjay Shirsat: भरत गोगावलेंचं मंत्रीपद संजय शिरसाटांमुळे हुकलं? ‘या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण; शिंदे गटातली धुसफूस चव्हाट्यावर!

महायुतीतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा झाल्या. महायुतीने प्रचारात प्रामुख्याने मतांच्या ध्रुवीकरणावर भर दिला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन अल्पसंख्याकबहुल मालेगावात करण्यामागेही तेच एक कारण होते. महाविकास आघाडीने वाढती महागाई, बेरोजगारी यांसह विशेषत: शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न, पाणीटंचाई, औद्याोगिकीकरणाचा अभाव या विषयांवर प्रचारात भर दिला.