शहरात कोरोनाची संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत असले तरी नागरीकांनी स्वयंशिस्त बाळगणे आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातून नागरीकांनी सजग राहून स्वत:ची आणि कुटुंबांची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर सतिश कुलकर्णी यांनी केले.
राज्य शासनाने सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी च्या माध्यमातून कोविड मुक्त योजनेच्या शुभारंभाचा मुख्य कार्यक्र म नाशिक पूर्व विभागाच्या कार्यालयात मंगळवारी (दि.२२) झाला. यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त कैलास जाधव, सभागृह नेते सतीश सोनवणे,माझे कुटुंब माझी जबाबदारी चे सनियंत्रण अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या मोहिमेचा शुभारंभ प्रातिनिधिक स्वरूपात पथकांना थर्मल गन
सारख्या वस्तूंचे किट देऊन करण्यात आला.
यावेळी नगरसेवक अॅड. शाम बडोले, सुषमा पगारे, उपआयुक्त करु णा डहाळे, डॉ. प्रशांत शेटे, विभागीय अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. मुख्य सोहळ्यंनतर नाशिक महानगरपालिकेच्या इतर पाच विभागांमध्येही या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
राज्यासह शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने कुटुंब हा केंद्र बिंदू मानून त्याचे कोरोनापासून रक्षण व्हावे या हेतूने राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी विविध मोहिमांना प्रारंभ केला आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी जोपर्यंत लस किंवा औषध बाजारामध्ये येत नाही, तो पर्यंत नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे, असे आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी सांगितले. प्रशासन सर्व स्तरावर काम करत असून नागरिकांनी देखील प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले पाहिजे जेणे करून कोरोनासारख्या संकटातून सर्वांना बाहेर पडता येईल, असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला.