माल वाहतुकीत हमालीची जबाबदारी मालकावर

इंधन दरवाढ, प्रलंबित भाडेवाढ आदी प्रश्नांमुळे अडचणीत आलेल्या माल वाहतुकदारांना हमालीचा अतिरिक्त बोजाही सहन करावा लागत आहे.

वाहतूकदार संघटनेचा निर्णय

नाशिक : इंधन दरवाढ, प्रलंबित भाडेवाढ आदी प्रश्नांमुळे अडचणीत आलेल्या माल वाहतुकदारांना हमालीचा अतिरिक्त बोजाही सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमी वर, माल वाहतूक करतांना लागणाऱ्या हमालीची जबाबदारी संबंधित मालकावर राहणार असल्याचा निर्णय नाशिक जिल्हा वाहतूकदार संघटनेने घेतला आहे. याबाबतची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड, कार्याध्यक्ष पी. एम. सैनी यांनी आयमा, निमा, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्यासह जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिली.

देशातील दळण वळणात वाहतूकदारांचे मोलाचे योगदान आहे. वाहतूकदारांना निरनिराळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते.

हे वाचले का?  Mangesh Sasane : “मराठ्यांची नोंद ‘क्षत्रिय’ तर कुणबींची नोंद ‘क्षुद्र’ म्हणून, गॅझेट वाचा, अज्ञानी मागण्या…”, मंगेश ससाणेंचा मनोज जरांगेंना सल्ला

हमाली आणि वराई वाहतूकदारांनाच करावी लागते. माल वाहतूक करणे ही मुख्य जबाबदारी असून त्यात एका जागेहून दुसऱ्या जागेत माल नेताना अनेक गाव, जिल्हे, राज्य अशी वाहतूक करावी लागते. त्यात हमाली आणि वराईसाठी वाहन चालकास सक्ती केली जाते. बाहेरगावाहून आलेल्या वाहन चालकास ही सर्व व्यवस्था करणे शक्य होत नसल्याची त्याची लूट होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मालवाहतूक करताना गाडी भरण्यासाठी लागणारी हमाली, वराई, माल उतरविण्यासाठी लागणारी हमाली, वराई याचा भार गाडी मालक आणि वाहतूकदार चालकांना सहन करावा लागतो. या खर्चामुळे उलाढाल वाढते. त्याचा नाहक फटका सहन करावा लागतो.

हे वाचले का?  नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा

मालवाहतुकीत अनधिकृत हमाली घेतली जाते. त्यामुळे वाहतूकदारांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कांदा, द्राक्ष व्यापारी आणि कंपनी मालकांच्या मनमानी कारभारालाही तोंड द्यावे लागते. त्यामुळे वाहतूकदारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातच करोना महामारीमुळेही वाहतूकदारांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. या सर्व प्रकारच्या समस्यांमधून सुटका करण्यासाठी वाहतूकदारांचे प्रयत्न सुरु असल्याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे.

वास्तविक मालाची वाहतूक करताना माल भरण्याची आणि उतरविण्याची जबाबदारी ही पूर्णपणे त्या मालाच्या मालकाची असते. मात्र त्याचा नाहक भुर्दंड गाडी मालक आणि वाहतूकदारांना सहन करावा लागतो. त्यामुळे वाहतूकदार संघटनेच्या वतीने याबाबत माल भरणे आणि उतरविण्याची संपूर्ण जबाबदारी ही मालाच्या मालकाची राहणार असल्याबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूकदार यापुढे गाडीत माल भरणे तसेच उतरविणे याचे पैसे भरणार नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.

हे वाचले का?  सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल