मालेगावात मालमत्ता कर ऑनलाइन भरता येणार

सध्याच्या काळात अनेक आर्थिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होऊ  लागले आहेत.

‘ड’ वर्गातील राज्यातील पहिली महापालिका

मालेगाव : शहरातील मालमत्ताधारकांना करांचा भरणा सुलभरीत्या करता यावा म्हणून महानगरपालिकेतर्फे ऑनलाइन अर्थात ‘फोन पे’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर भरण्यासाठी अशा प्रकारे सुविधा उपलब्ध करून देणारी मालेगाव ही राज्यातील पहिली ‘ड’ वर्ग महापालिका ठरली आहे.

शहरात ५० हजारांपेक्षा अधिक मालमत्ता आहेत. या मालमत्तांच्या कराची रक्कम रोखीने अथवा धनादेशाद्वारे अदा करण्याची पद्धत आहे. यात महापालिका कर्मचारी घरोघरी जाऊन वसुली करीत असतात किंवा संबंधित मालमत्ताधारक पालिकेच्या प्रभाग कार्यालयांमध्ये जाऊन रकमेचा भरणा करीत असतात.

हे वाचले का?  RTE Admission 2024: पहिल्या सोडतीनंतर तीन हजाराहून अधिक जागा रिक्त – सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

सध्याच्या काळात अनेक आर्थिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होऊ  लागले आहेत. करोना संक्रमण काळात तर ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करण्याचा लोकांचा कल आणखी वाढला आहे. अशा वेळी नागरिकांना करभरणा करताना सोयीचे व्हावे म्हणून ‘फोन पे’ सुविधा विकसित करण्याचे निर्देश आयुक्त त्र्यंबक कासार यांनी संगणक विभागास दिले होते. या निर्देशाप्रमाणे संगणक विभागप्रमुख सचिन महाले यांनी या सुविधेची पूर्तता केल्यावर महापौर ताहेरा शेख यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. उमाकांत पाटील यांनी ‘फोन पे’द्वारे कर रक्कम अदा केली.

हे वाचले का?  अजित पवार उशीरा आल्याने लाडकी बहीण मेळाव्यास अनुपस्थित

याप्रसंगी उपमहापौर नीलेश आहेर, आयुक्त त्र्यंबक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, सहायक आयुक्त राहुल मर्ढेकर, तुषार आहेर, वैभव लोंढे, लेखापाल कमरुद्दीन शेख आदी उपस्थित होते. या सुविधेचा वापर करून नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करण्याचे आवाहन आयुक्त कासार यांनी या वेळी केले. नागरिकांना घरूनच भरणा करता यावा म्हणून पुढील वर्षांपासून कर देयकावरच महापालिकेचा ‘क्यूआर कोड’ प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.