मिताली महिला आयपीएल खेळणार असे ट्विट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केले आहे. या स्पर्धेची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे.
पुणे : भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि अनुभवी क्रिकेटपटू मिताली राजने पुन्हा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, मिताली पुन्हा एकदा मैदानावर फलंदाजी करताना दिसू शकते. महिला क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या मितालीने प्रथमच भारतात होणाऱ्या महिला आयपीएलमध्ये पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.
मिताली महिला आयपीएल खेळणार असे ट्विट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केले आहे. या स्पर्धेची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी, वायकॉम १८ ने लीगचे मीडिया अधिकार 951 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.
मिताली राज याआधी महिला टी-२० चॅलेंजमध्येही खेळली आहे. मात्र, गेल्या मोसमात ती खेळली नाही. २०२२ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात ती अखेरची खेळली होती. यानंतर जूनमध्ये तिने समाज माध्यमावर निवृत्तीची घोषणा केली. यानंतर मिताली नुकत्याच झालेल्या पुरुष ट्वेंटी 20 विश्वचषक स्पर्धेत समालोचन करताना दिसली.