मुंबई पालिकेकडे लसींचा तुटवडा? कोविशिल्ड, कोर्बावॅक्सच्या मात्रा संपल्या; कोवॅक्सिनच्या फक्त ६००० मात्रा शिल्लक!

अशाच मुंबई पालिकेकडे लसींचा तुटवडा, असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.

चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाचा उद्रेक झाला आहे. चीनमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.७’ या उपप्रकाराचे भारतातही तीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत गुजरातमध्ये दोन आणि ओदिशामध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात अद्याप एकही रुग्ण आढळला नसला, तरी राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत मुंबई पालिकेकडे लसींचा तुटवडा, असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी डॉ. संजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे कोविशील्ड आणि कोर्बावॅक्स लसींचा साठा उपलब्ध नसून कोवॅक्सिनचे फक्त सहा हजार मात्रा शिल्लक आहेत. “आम्ही याबाबत राज्य सरकारशी संपर्क केला असून लवकरच कोवॅक्सिन लसीचा मात्रा उपलब्ध होईल. तसेच आवश्यकतेनुसार कोविशील्ड आणि कोर्बावॅक्स लसींचा साठाही उपलब्ध करून दिला जाईल”, अशी माहिती डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे. तसेच लसीकरणाचा दरही कमी झाला असून गेल्या दोन महिन्यात दररोज १०० पेक्षा कमी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

हे वाचले का?  Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?

मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत केवळ १३ टक्के नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. तसेच कोवीन पोर्टलनुसार १,०८,८९,९४७ नागरिकांनी करोना लसीचा पहिला मात्रा घेतली असून ९८,०९,०१९ नागरिकांनी करोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. तर केवळ १४,५०,९१५ नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. २०२१ मध्ये मुंबईत लसीकरणासाठी ३०० पेक्षा जास्त लसीकरण केंद्र सुरू होती. मात्र, आता केवळ ८२ लसीकरण केंद्र सुरू आहेत.

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासांत दोन हजार ८९ नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली असून केवळ सात रुग्ण आढळून आले आहेत. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३ टक्के आहे. चीनमधील वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी गर्दीच्या जागी जाणे टाळावे आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि नियमित आरटी-पीसीआर चाचणी करण्यावरही भर देण्यात येत आहे. विमानतळांवरही बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.

हे वाचले का?  LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…