मुंबईतील टॅक्सी चालकांचा बेमुदत संपाचा इशारा, रिक्षा चालकांचाही संपाला पाठिंबा

मुंबईत सध्या टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपये आहे. त्यात १० रुपयांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी टॅक्सी चालकांनी केली आहे

मुंबईतील टॅक्सी चालक संघटनांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून टॅक्सी चालक संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. टॅक्सीचे किमान प्रवासी भाडे १० रुपयांनी वाढवावे, अशी टॅक्सी चालकांची प्रमुख मागणी आहे. मुंबईत सध्या टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपये आहे. त्यात १० रुपयांची वाढ करण्यात यावी, यासाठी टॅक्सी चालक संघटना आक्रमक झाली आहे. या संपाला मुंबईतील रिक्षा चालकांनीही पाठिंबा दर्शवला आहे.

हे वाचले का?  “पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

भाडेवाढीबाबत टॅक्सी चालक संघटनेकडून याआधी शिंदे सरकारकडे मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागण्यांवरील निर्णय सरकार दरबारी प्रलंबित आहे. यासंदर्भात टॅक्सी चालक संघटना आणि सरकारमध्ये अनेकदा चर्चा झाल्या. मात्र, या चर्चांमधून भाडेवाढीबाबत तोडगा न निघाल्यामुळे अखेर टॅक्सी चालक संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. दरम्यान, टॅक्सी चालक संघटनेचे शिष्टमंडळ मंगळवारी सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. या भेटीत भाडेवाढीबाबत निर्णय न झाल्यास संपावर कायम राहणार असल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024: नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!

सीएनजीच्या वाढलेल्या दरांमुळे टॅक्सी चालकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्या तुलनेत सध्याची भाडेवाढ अत्यंत कमी असल्याचे मत टॅक्सी चालकांनी व्यक्त केले आहे. टॅक्सी चालक संपाच्या निर्णयावर कायम राहिल्यास मुंबईतील सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.