मुखपट्टीच्या किंमतीचीही आता तपासणी रेमडेसिवीर निश्चित दरात मिळणार

रेमडेसिवीर निश्चित दरात मिळणार

नाशिक : सामान्य नागरिकांकडून वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या मुखपट्टीचे दर शासनाने निश्चित केले असले तरी त्याची अनेक ठिकाणी महागडय़ा दरात विक्री होत आहे. या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाच्या वतीने मुखपट्टी विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांकडील किमतीची तपासणी केली जाणार आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या करोनाबाधितांना रेमडेसिविर उपलब्ध होण्यातील अडचणी दूर केल्यानंतर प्रशासनाने ते महागडय़ा दरात खरेदी करावे लागू नये म्हणून शहरात आणि ग्रामीण भागासाठी प्रत्येकी एका खासगी औषध विक्रेत्याकडे ते प्रति कुपी २३६० रुपयांत उपलब्ध होईल याची व्यवस्था केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मुखपट्टीचा वापर बंधनकारक केले आहे. मुखपट्टय़ांची वाढती मागणी लक्षात घेऊन अव्वाच्या सव्वा किमतीत त्यांची विक्री होत आहे. या संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर शासनाने उत्पादकाची किंमत, त्यावरील वितरक, विक्रेता यांचा नफा गृहीत धरून द्विस्तरीय, त्रिस्तरीय आणि एन-९५ मुखपट्टीच्या किमती निश्चित केल्या. त्यानुसार या तीनही प्रकारांतील मुखपट्टी प्रकारनिहाय किमान १९ ते अधिकतम ४९ रुपयांच्या दरम्यान आहेत. याच दराने त्यांची विक्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाने निश्चित केलेल्या दराने मुखपट्टीची विक्री होते की नाही, याची पडताळणी केली जाणार असल्याचे अन्न, औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी सांगितले. निश्चित दरापेक्षा अधिक किमतीने मुखपट्टीची विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधित औषध विक्रेत्यांवर कारवाई नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

हे वाचले का?  नाशिकात ATS ची कारवाई, दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत

दरम्यान, करोनावरील उपचारात शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णांना हे औषध मोफत स्वरूपात दिले जाते; परंतु खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ते मिळत नाही किं वा मिळाले तर महागडय़ा दरात खरेदी करावी लागत असल्याच्या अनेक तक्रारी आधी झाल्या होत्या. रेमडेसिविरचा तुटवडा भासणार नाही यासाठी प्रशासनाने आधीच दैनंदिन देखरेखीची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे औषध विक्रेत्यांना दर्शनी भागात उपलब्ध साठा आणि किंमत प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना शासनाने निश्चित केलेल्या दरात ते उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्ह्य़ातील दोन खासगी औषध विक्रेत्यांकडे ते उपलब्ध करण्यात आले आहे. शहरातील रुग्णांसाठी हे इंजेक्शन त्र्यंबक रस्त्यावरील सन मेडिकल आणि ग्रामीण भागासाठी मालेगावच्या अशोका मेडिकल या दुकानात मिळणार आहे. खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांना किती कुप्यांची गरज आहे ते निश्चित करून जिल्ह्य़ाची मागणी निश्चित केली जाईल. या योजनेत समाविष्ट उत्पादकांकडून निश्चित केलेल्या दराने कुप्या संबंधित औषध दुकानात वितरित केल्या जाणार आहेत. खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी इंजेक्शनची एकूण किंमत २३६० रुपये असेल. इंजेक्शन देताना रुग्णाचा अहवाल, आधारकार्डची प्रत, रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अशी माहिती सादर करावी लागणार आहे. या योजनेसाठी जिल्हा रुग्णालयात टेली मेडिसन कक्षही स्थापन करण्यात आला आहे.

हे वाचले का?  अजित पवार गटाकडून आमदारांना संधी, चार जणांना एबी अर्ज, तिघे बाकी

प्रत्येक आठवडय़ाला अन्न औषध प्रशासन खासगी औषध केंद्रात भेट देऊन साठा तपासणी, कागदपत्र तपासणी करणार आहेत. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या रुग्णांनी या योजनेंतर्गत आवश्यक ती कागदपत्रे सादर करून लाभ घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले आहे.