उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या पुढाकाराने रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
रत्नागिरी : दरवाजे उघडेच ठेवा, सर्व बाहेर जाणार आहेत, तुम्ही दोघेच उरणार आहात, कारण तुम्ही शिवसेना कार्यकर्त्यांना मोठे होऊ दिले नाही, त्यांना संधी नाकारली अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत रविवारी खेड येथे केली.
उद्धव ठाकरे यांनी ५ मार्च रोजी खेडमधील ज्या गोळीबार मैदानावर सभा घेतली होती, तेथेच त्यांना उत्तर देण्यासाठी माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या पुढाकाराने रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. शिंदे म्हणाले की, याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक आपटी बार येऊन गेला. पण मी त्यांना उत्तर द्यायला आलेलो नाही. गेले काही महिने त्यांचा एकच उद्योग चालू आहे. जागा बदलते. पण मुद्दे तेच असतात. त्यांचे शो राज्यभर चालू राहणार आहेत. ‘खोके’ आणि ‘गद्दार’ याशिवाय तिसरा शब्द त्यांच्या भाषणांमध्ये नसतो. पण त्यांनी सत्तेसाठी हिंदूुत्व सोडले. बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष त्यांनी सत्तेसाठी गहाण ठेवला. बाळासाहेबांच्या विचारांशी बेइमानी केली. हिंदूुत्वाला डाग लावण्याचे काम केले. सत्तेसाठी भूमिका बदलली. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि धनुष्यबाण घेऊन पुढे चाललेलो आहोत.
आम्ही गद्दारी केली नाही असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, गद्दारी २०१९ साली झाली. राहुल गांधी आणि इतरांच्या बरोबर सत्तेसाठी गद्दारी केली गेली. हा एकनाथ शिंदे गद्दार नाही. वफादार आहे. यांनी नेहमी कार्यकर्त्यांला लहान करण्यात काम केले, कार्यकर्त्यांला संधी दिली नाही. पण यांना कल्पना नाही की एक काळ असा येईल की जेव्हा त्यांच्याबरोबर कोणी राहणार नाही फक्त हम दो आणि हमारे दो एवढेच राहतील.
महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या विकासासाठी विविध योजना हे सरकार राबवत आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी अशा काही योजनांची जंत्रीही सादर केली. शिंदे यांच्या भाषणापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री उद्योग मंत्री उदय सामंत शिक्षण मंत्री शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर खासदार गजानन कीर्तिकर इत्यादींची भाषणे झाली.
आम्ही बाळासाहेबांच्या संपत्तीचे नाही, तर विचारांचे वारसदार आहोत. म्हणून नेहमी राज्याच्या हिताची भूमिका घेऊन आम्ही विकासासाठी काम करत राहणार आहोत.