अलीकडेच सलग काही दिवस मुसळधार पावसाची अनुभूती घेणाऱ्या नाशिककरांना गुरूवारी सायंकाळी तुफानी पावसाचा तडाखा सहन करावा लागला.
नाशिक : अलीकडेच सलग काही दिवस मुसळधार पावसाची अनुभूती घेणाऱ्या नाशिककरांना गुरूवारी सायंकाळी तुफानी पावसाचा तडाखा सहन करावा लागला. अवघ्या काही मिनिटांत रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहू लागले. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. विजांच्या गडगडाटात सुरू झालेल्या पावसाने शालेय विद्यार्थी, विक्रेते, वाहनधारक अशी सर्वाची दाणादाण उडवली. अनेक भागात झाडे कोसळली. रस्ते, चौक जलमय झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. अर्धा ते पाऊण तासात २७ मिलीमीटर पाऊस झाला.
शहर परिसरात दोन, तीन दिवसांपासून उकाडा वाढला होता. दुपारी वातावरण ढगाळ झाल्यानंतर असा पाऊस कोसळेल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. सायंकाळी पावणे पाचला विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. रस्त्यावरून चालणे वा वाहन चालवणे अवघड झाले. काही फूट अंतरावरील दिसत नव्हते. वाहनांचे दिवे लावूनही उपयोग होत नव्हता. पावसाचा मारा सहन करीत दुचाकी चालवणे अशक्यप्राय झाले. नागरिकांसह विक्रेत्यांची धावपळ उडाली. गंगापूर रस्त्यावरील प्रमोद महाजन बगिच्याच्या संरक्षक भिंतीचे झाड पडून नुकसान झाले. महापालिका मुख्यालयासमोरील चौकात जलाशयाचे स्वरुप आले. गंगापूर रोड, कॉलेज रोड, पंचवटी, नाशिकरोड, आदी सर्वच भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले होते. तिगरानिया कॉर्नर भागातील काशीमाळी मंगल कार्यालय परिसरात पाणी शिरले. सिडको आणि सातपूरमध्ये प्रत्येकी एक तर पंचवटी भागात दोन ठिकाणी झाड पडल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. या घटनांमध्ये कोणी जखमी झाले नाही.
फुल बाजार, सराफ बाजार परिसरात पाण्याचे लोंढे शिरले. वाहनतळ परिसरातील वाहने पाण्याखाली गेली. अकस्मात आलेल्या पावसाने व्यावसायिकांची धावपळ उडाली. बहुतांश रस्त्यांवर पाणी आल्याने वाहनधारकांना मार्गस्थ होणे अवघड बनले. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पाण्याचा हळूहळू निचरा होऊ लागला. पण, सखल भागात पाणी साचलेले होते. मनपाच्या बांधकाम विभागाने पावसानंतर पाण्याचा त्वरित निचरा होण्यासाठी कार्यवाही केली. पश्चिम विभागातील सराफ बाजार, मायको सर्कल, कॉलेज रोड या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यात आला. सातपूर प्रभाग क्रमांक ११, एमआयडीसी, मिहद्रा टुल जवळही पाणी काढण्यात आले. सातपूर प्रभाग क्रमांक नऊ, मनपा शाळा क्रमांक २१ कडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि प्रभाग क्रमांक १० मधील सुला चौकातील पावसाळी पाणी काढण्यात आले. त्याशिवाय सातपूर प्रभाग क्रमांक नऊ पार्थ हॉटेलमागील जाळी, शिवाजीनगर बस थांब्याजवळील ढापार येथेही काम करण्यात आले. शहरातील प्रभाग क्रमांक सहा, आसाराम बापू रोड, रासबिहारी रोड, मखमलाबाद रोड हनुमानवाडी जलकुंभाजवळ देखील पाण्याचा निचरा करण्यात आला. शहरात तुफान पाऊस कोसळत असताना त्र्यंबकेश्वर व गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रात तितका जोर नसल्याने गंगापूरमधून पाणी सोडावे लागले नाही. सायंकाळी अर्धा ते पाऊण तासात शहरात २७ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. पुढील काही तासात अतिवृष्टी व मुसळधार पावसाचा इशारा दिला गेल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
शालेय विद्यार्थी अडकले
सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेलाच तुफान पाऊस सुरू झाल्यामुळे बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी अडकून पडले. पावसाची तीव्रता आणि बाहेरील स्थिती लक्षात घेऊन शिक्षकांनी शाळा सुटल्यानंतरही मुलांना वर्गातच थांबवून ठेवले. शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी पोहोचवण्यास प्राधान्य दिले. सर्वच रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत असल्याने पालकांसमवेत दुचाकी वा पायी जाणाऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले.
अनेक भागात वीज पुरवठा विस्कळीत
पावासने शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा विस्कळीत झाला. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वीज पुरवठय़ात व्यत्यय आल्याचा अंदाज आहे. गंगापूर रोडसह काही भागात दीड ते दोन तासांनी वीज पुरवठा पूर्ववत झाला.