हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंगे या दोन्ही विषयांसंदर्भात भाजपा आणि मनसे हे समविचारी पक्ष असल्याचं दिसत आहे
राज्याच्या राजकारणामध्ये सध्या सर्वाधिक चर्चेचे विषय म्हणजे हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंगे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मनसेच्या मेळाव्यात भाषणामधून मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्याला हात घातल्यानंतर या दोन्ही विषयांसंदर्भात भारतीय जनता पार्टी आणि मनसेची भूमिका सारखी असल्याचे दिसत आहे. याच मुद्द्यावरुन आता मनसेसोबत भाजपा युती करणार का या चर्चांना राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये उधाण आलंय. असं असतानाच मनसेसोबतच्या युतीबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केलीय.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीसंदर्भात भाष्य केलं. मनसेसोबत सध्या युती नाही असे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. राज ठाकरे भविष्यातील मित्र असतील मात्र आता युतीची काही शक्यता नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. मनसेसोबतच्या युतीचा निर्णय राष्ट्रीय कर्यकारणी घेईल म्हणजेच मनसे सोबतच्या युतीचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या मनसेसोबतच्या युतीसंदर्भात बोलताना, “भाजपा कुठल्याही पक्षाला बरोबर घेताना राज्याची आमची कोअर कमिटी निर्णय घेते. खास करुन मनसेसारखा निर्णय तर आमचा केंद्रात होईल,” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. तसेच पुढे बोलताना, “मनसेची अमराठीसंदर्भातील जी भूमिका आहे त्याच्यामध्ये आम्हाला केंद्रानेच विचार करावा लागेल. आज तरी मनसेसोबत युतीचा कुठलाही प्रस्ताव आमचा नाही,” असंही भाजपा प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलं.
मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी मनसे व भाजपाने केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने राज्य सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीलाही भाजपा आणि मनसेचे मुख्य नेते अनुपस्थित होते. भाजपाने तर या बैठकीमध्ये सहभागच नोंदवला नाही. या बैठकीवर बहिष्कार घातल्याचे जाहीर करून पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्ष नेते दवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हिंदूधर्मीयांनी नवरात्री, गणेशोत्सवासह अन्य सण व कार्यक्रमांमध्ये याबाबतच्या अटी व निर्बंधांचे पालन केले आहे, तसे आता मुस्लीमधर्मीयांनीही करावे.