मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक

उद्या होणाऱ्या बैठकीला शेतकरी उपस्थित राहणार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांनी आता भारत बंदची हाक दिली आहे. ८ डिसेंबरला एक दिवसाचा देशव्यापी संप शेतकऱ्यांनी पुकारला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात आम्ही हा संप पुकारला असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. उद्या सरकारतर्फे जी बैठक आयोजित केली आहे त्या बैठकीला आम्ही हजर राहू असंही शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांच्या संपाचा आज नववा दिवस आहे. मोदी सरकारने कृषी कायदे रद्द करावेत त्यात सुधारणा करु नये अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पंजाब, हरयाणा या राज्यातले शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्यांना अडवण्यात आलं असलं तरीही ते आंदोलनावर ठाम आहेत. केंद्र सरकारने चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे मात्र आत्तापर्यंतच्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत.त्यानंतर आता शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. असं असलं तरीही उद्या होणाऱ्या बैठकीला शेतकरी हजर राहणार आहेत.

कृषी कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार आहे. मोदी सरकारने हे कायदे रद्द करावेत हीच आमची ठाम भूमिका आहे असं ऑल इंडिया किसान सभेचे कार्यकारी सचिव हनान मोलाह यांनी म्हटलं आहे. आम्ही कालच सरकारला आमची मुख्य मागणी सांगितली आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात यावेत, रद्द करण्यात यावेत ही आमची मुख्य मागणी आहे.

हे वाचले का?  Narendra Modi : मोदींचं पोलंडमध्ये मराठीतून भाषण! कोल्हापूर स्मारकाला भेट देऊन म्हणाले, “छत्रपती घराण्याने पोलिश महिला व मुलांसाठी…”