५६६ रुग्णांसाठी केवळ २५० इंजेक्शनचा पुरवठा
नाशिक : म्युकरमायकोसिसचे सद्यस्थितीत एकूण ५६६ रुग्ण असून त्यांच्यासाठी बुधवारी शासकीय कोटय़ातून केवळ २५० अॅम्फोटेरेसीन बी इंजेक्शन वितरित झाली. इंजेक्शन वितरणासाठी जिल्हानिहाय प्रशासनाने व्यवस्था कार्यान्वित केलेली आहे. प्रारंभीचे तीन दिवस आरोग्य विभागाकडून प्रतिदिन ३०० ते ६०० इंजेक्शन विभागात वितरित व्हायची. आता ही संख्या बरीच कमी झाल्यामुळे रुग्णांचे हाल कायम राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
करोनापश्चात काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. या उपचारात महत्त्वाचे ठरू शकणाऱ्या अॅम्फोरेटेसीन बी इंजेक्शनची तुटवडय़ामुळे महागडय़ा दरात विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. शासकीय यंत्रणेकडील साठय़ातून इंजेक्शन मिळावे म्हणून नातेवाईक धडपड करतात. त्यासाठी मागील आठवडय़ात जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाईकांच्या रांगा लागत होत्या. या इंजेक्शनच्या वितरणासाठी प्रशासनाने नाशिक आणि मालेगाव महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण भागासाठी आरोग्य विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
अन्य जिल्ह्यात वितरणासाठी या स्वरूपाची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयाने विहित नमुन्यात रुग्णाची दिलेली माहिती पडताळून इंजेक्शनची निकड सक्षम अधिकारी निश्चित करतील. त्यानुसार इंजेक्शन रुग्णालयांना पुरविण्याचे नियोजन करण्यात आले.
तथापि, आरोग्य विभागाकडून जिल्हावार होणारा पुरवठा बघता रुग्णसंख्येच्या तुलनेत केवळ निम्म्या इंजेक्शनचा पुरवठा झाल्याचे लक्षात येते.
आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत बुधवारी विभागातील ५६६ रुग्णांसाठी २५० इंजेक्शनचे वितरण करण्यात आले. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात २२१ रुग्ण असून त्यांच्यासाठी केवळ ९८, नंदुरबार जिल्ह्यात ११ रुग्णांसाठी पाच, धुळे जिल्ह्यात ७७ रुग्णांसाठी ३४, जळगावमध्ये ३५ रुग्णांसाठी १५, अहमदनगर जिल्ह्यात २२२ रुग्णांसाठी ९८ इंजेक्शन देण्यात आले. निर्देशामुळे इंजेक्शन निर्मिती कंपन्या थेट आरोग्य विभागाला इंजेक्शन वितरण करीत आहे. तुटवडय़ामुळे खासगी वितरकांना ते मिळत नाहीत. नाशिकच्या स्थानिक खासगी वितरकाकडे २२ मे रोजी अखेरची इंजेक्शन आली होती. आता आरोग्य विभागामार्फत ती रुग्णालयांना दिली जात आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील रुग्ण संख्या आणि वितरित झालेली इंजेक्शन यांचा ताळमेळ बसू शकत नाही. संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी वेळेवर इंजेक्शन मिळणे रुग्णासाठी महत्त्वाचे असते. ही इंजेक्शन अतिशय महागडी आहेत. सामान्य रुग्ण मोठा आर्थिक भार पेलू शकत नाही. त्यामुळे या आजारावरील उपचार महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत देण्याचे नियोजन केले आहे.
काही राज्यांचा वाटा पडून
या इंजेक्शनच्या वितरणावर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. केंद्राने उत्पादक औषध कंपन्यांना कोणत्या राज्याला किती इंजेक्शन वितरीत करायचे याचा कोटा निश्चित करून देण्यात आला आहे. तथापि, काही राज्यांनी कोटय़ात मिळालेली ही इंजेक्शन खरेदी केली नाहीत. त्या राज्यास बहुदा गरज नसताना कोटा दिला गेला असावा. औषध कंपन्यांकडे संबंधितांच्या कोटय़ातील सध्या पडून असलेली इंजेक्शन महाराष्ट्रातील रुग्णांसाठी द्यावीत, अशी मागणी काही खासगी वितरकांनी केली. तथापि, त्याची दखल कुणी घेत नसल्याची तक्रार स्थानिक औषध वितरकांनी केली.
१५ रुग्णांचा मृत्यू
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार म्युकरमायकोसिसने आतापर्यंत १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जळगाव आणि नगर जिल्ह्यातील प्रत्येकी सहा तर धुळे जिल्ह्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. या आजारातून विभागातील २८ रुग्ण बरे झाले. त्यात नगर जिल्ह्यातील तीन, धुळे आठ, जळगावमधील नऊ, नंदुरबार जिल्ह्यातील आठ रुग्णांचा अंतर्भाव आहे.
पुरवठय़ात निम्म्याने घट
१९ मे रोजी विभागात एकूण ६५० इंजेक्शन मिळाली होती. २० तारखेला ७३० आणि २१ मे रोजी ६०० इंजेक्शनचा पुरवठा झाला. जिल्हानिहाय रुग्णसंख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने त्याचे वितरण केले. तथापि, आता इंजेक्शनच्या पुरवठय़ात निम्म्याने घट झाली आहे.