म्हसवडच्या श्री सिद्धनाथांचा शाही विवाहाचा सार्वजनिक सोहळा रद्द

करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतला निर्णय

वाई: लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले म्हसवड येथील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा या वर्षीचा पारंपारिक शाही विवाह सोहळा करोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाकडून रद्द करण्यात आला आहे. मंदिरात अंतर्गत मोजक्याच, तेही पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साध्या पध्दतीने विधीपूर्वक पार पडणार असल्याची माहिती देवस्थान मंदिर ट्रस्टींकडून देण्यात आली.

दरवर्षी तुलशीविवाहाच्या दिवशी हा विवाह सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थित संपन्न होत असतो. पण यंदा मात्र हा विवाह सोहळा गुरुवारी (२६ नोव्हें) रात्री बारा वाजता सालकरी पुरोहित व मंदिराचे पुजारी, मानकरी यांच्या मोजक्याच संख्येतील उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यास भाविकांना मंदिरात दर्शनासाठी येण्यास मनाई करण्यात आली आहे. मंदिराचे सर्व दरवाजे बंद करुन पोलिस बंदोबस्तात हा विवाह सोहळा होणार आहे. करोनाच्या साथीचा संसर्ग होऊ नये व त्याचा प्रसार, प्रादुर्भाव वाढू नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यासाठी शासनाने असा निर्णय घेतला आहे.

हे वाचले का?  नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा

तुलशी विवाहाच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी दिवसभर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असून दूरगावातील भाविकांनी या दिवशी मंदिरात दर्शनासाठी येऊ नये तसेच म्हसवड शहर व परिसरातील भाविकांनीही मंदीर व मंदिर परिसरात फिरकू नये, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. बाहेरगावच्या व स्थानिक तमाम भाविकांनी याची नोंद घेऊन शासनाला व मंदिर व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहन सिध्दनाथ देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले आहे.

हे वाचले का?  आठव्या माळेला भवानी तलवार अलंकार महापूजा; आज होमहवन, पूर्णाहुती उद्या घटोत्थापन

दरम्यान, १५ डिसेंबर रोजी होणारी रथयात्रा यंदा आयोजित केली जाणार आहे की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. यावर शासन काय निर्णय घेईल, त्यानुसार कार्यवाही होईल असेही देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.