दिवाळीनिमित्त महापालिका दरवर्षी फटाके विक्रीसाठी खुल्या जागांचा जाहीर लिलाव करते.
प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांची जिल्हा प्रशासनास सूचना
नाशिक : ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत प्रदूषण रोखण्यासाठी विभागातील सर्व महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने फटाके विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा ठराव करून अधिसूचना प्रसिध्द करावी, अशी सूूचना विभागीय आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाक्याविना साजरी करावी लागण्याची चिन्हे आहेत. या पत्रानुसार नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर जिल्ह्यात तसे ठराव झाल्यास दिवाळी फटाक्यांशिवायसाजरी करावी लागणार आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानात फटाके बंदी महत्वाचा भाग असून यासाठी पुढाकार घेणाऱ्यांना १०० गुण देण्यात आले आहे. दिवाळीत फटाक्यांची मोठी आतषबाजी केली जाते.
पर्यावरण संवर्धनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात फटाके विक्री व वापर यावर बंदी घालण्यासाठी ठराव करून अधिसूचना प्रसिध्द करणे आवश्यक आहे.
सण, उत्सवात हवेची गुणवत्ता राखली जावी याकरिता विभागातील सर्व मनपा, नगरपालिका व नगरपंचायतींनी तातडीने ठराव करून अधिसूचना प्रसिध्द करावी. आवश्यक भासल्यास विशेष सभेचे आयोजन करावे, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी म्हटले आहे.
दिवाळीच्या ऐन तोंडावर हे पत्र मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची तारांबळ उडाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने एक सप्टेंबर २०२१ रोजी हे पत्र तयार केले होते. परंतु, आयुक्तांची स्वाक्षरी त्यावर महिनाभराने झाली. यामुळे ही सूचना मिळण्यास विलंब झाल्याचे सांगितले जाते.
महापालिकेची पंचाईत
दिवाळीनिमित्त महापालिका दरवर्षी फटाके विक्रीसाठी खुल्या जागांचा जाहीर लिलाव करते. या वर्षीसाठी १० बाय १० चौरस फूटाच्या खुल्या जागा २८ ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीसाठी देण्यात येणार आहेत. या खुल्या जागांचे लिलाव २१ ऑक्टोबरला सकाळी साडेअकरा वाजता विभागनिहाय कार्यालयात करण्याचे जाहीर करण्यात आल होते. तथापि, फटाके विक्री व वापरावर बंदी घातल्यास या गाळय़ांचे लिलाव कसे करता येतील, असा प्रश्न उभा ठाकला आहे. विभागीय आयुक्तांच्या पत्रानुसार प्रस्ताव तयार करून तो बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठेवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली असून खुल्या जागांचे लिलाव गुंडाळले जाण्याची शक्यता आहे.