“यात्रा करा नाहीतर येड्याची जत्रा करा…”; संजय राऊतांची नारायण राणेंवर अप्रत्यक्ष टीका

नाशिकमधल्या एका सभेत आज संजय राऊत बोलत होते.

राज्यातला शिवसेना- भाजपा संघर्ष अजूनही सुरूच आहे. वादग्रस्त वक्तव्याबद्दल मोठा वाद होऊन नारायण राणेंना अटक, जामीन, सुटका या नाट्यमय घडामोडींनंतरही दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतच आहेत. काही काळ थांबलेली नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा आता पुन्हा सुरू झाली आहे. त्यासोबतच टीकाटिप्पण्यांचं सत्रही सुरू झालेलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही नाशिकमधल्या एका सभेत बोलताना या यात्रेवर टीका केली आहे.

यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना राऊत म्हणाले, “आपण नेहमी सभ्यता पाळायची. आपल्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत. बाळासाहेबांचा एक मंत्र होता, जिओ और जिने दो. उगाच आम्ही कोणाला अंगावर घेणार नाही. पण अंगावर आला तर त्याला सोडणार नाही. कायतरी जन आशीर्वाद यात्रा निघाली. आपला कोणाला विरोध आहे का? यात्रा करा नाहीतर येड्याची जत्रा करा. अनेक ठिकाणी यात्रा निघाल्या पण काही जणांनी येड्याच्या जत्रा केल्या”.

हे वाचले का?  Mangesh Sasane : “मराठ्यांची नोंद ‘क्षत्रिय’ तर कुणबींची नोंद ‘क्षुद्र’ म्हणून, गॅझेट वाचा, अज्ञानी मागण्या…”, मंगेश ससाणेंचा मनोज जरांगेंना सल्ला

यावेळी त्यांनी भाजपाच्या इतर ठिकाणच्या यात्रांचं उदाहरणही दिलं. ते म्हणाले, “आता त्या भारती पवारांची यात्रा निघाली शांतपणे. भागवत कराड नावाचे मंत्री आहेत, त्यांनी यात्रा काढली, भगवानगडावर गेले, पूजाअर्चा केली. मुंडेसाहेबांना श्रद्धांजली वाहिली. कपिल पाटील नावाच्या मंत्र्यांनी यात्रा काढली. पण या तिन्ही मंत्र्यांनी शिवसेनेवर वक्तव्य केलं नाही, मुख्यमंत्र्यांवर वक्तव्य केलं नाही. महाविकास आघाडीबद्दलही काही वक्तव्य केलं नाही. तुम्ही तुमचा विचार घेऊन पुढे चाललेला आहात. प्रधानमंत्री मोदींनी सांगितलं, मलाही माहितीय त्यांनी काय सांगितलं. मला जास्त माहित आहे मोदी काय सांगतात. मोदींनी सांगितलं की जे नवे मंत्री आहेत त्यांनी आपापल्या भागात जाऊन केंद्र सरकार करत असलेल्या कामाची माहिती जनतेला द्या. सरकारच्या कामाचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी दिली. पण हा एक अतिशहाणा. ह्याने भाजपाचं ऐकलं नाही. सरकारचा मोदींचा प्रचार न करता शिवसेना, संजय राऊत, महाविकास आघाडीवर टीका केली”.