‘यूपीएससी’त मुली अव्वल! ; पहिल्या चारही क्रमांकांवर वर्चस्व : देशात श्रुती शर्मा पहिली

गेल्यावर्षी ७४९ जागांसाठी लोकसेवा परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी ६८५ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या लोकसेवा परीक्षा २०२१ मध्ये मुली अव्वल ठरल्या असून, गुणवत्ता यादीतील पहिल्या चारही स्थानांवर मुली आहेत. देशात दिल्ली येथील श्रुती शर्मा हिने पहिले स्थान पटकावले. कोलकाता येथील अंकिता अगरवाल ही दुसऱ्या, पंजाब येथील गामिनी सिंगला तिसऱ्या, तर ऐश्वर्या वर्मा चौथ्या स्थानावर आहे. मुंबईतील प्रियंवदा म्हाडदळकर ही देशात तेराव्या स्थानी आहे.

पहिल्या शंभरात राज्यातील साधारण पाच ते सहा उमेदवारांना स्थान मिळाल्याचे दिसते. यंदाही अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रमातील पदवीधरांचा निकालावर वरचष्मा असल्याचे दिसत आहे. द्विपदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचे प्रमाणही वाढल्याचे  दिसते आहे. 

गेल्यावर्षी ७४९ जागांसाठी लोकसेवा परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी ६८५ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. एकूण ८० उमेदवारांची तात्पुरती निवड करण्यात आली असून, एका उमेदवाराचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. या परीक्षा साखळीतील मुख्य परीक्षेचा निकाल १७ मे रोजी जाहीर करण्यात आला होता, तर ५ एप्रिल ते २६ मे या कालावधीत मुलाखती झाल्या. उपलब्ध जागांपैकी १८० जागा प्रशासकीय सेवा, ३७ परदेश सेवा, २०० पोलीस सेवा, २४२ गट अ तर ९० गट ब मधील जागा होत्या.

हे वाचले का?   ‘नीट-यूजी’ परीक्षेत व्यवस्थेला खिंडार नाही ; सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

यूपीएससीतील यशवंत

ओंकार पवार (१९४)

मी सातारा जिल्ह्यातील सलताने गावातील आहे. गावी आईवडील, आजी-आजोबा, बहीण यांच्यासह राहतो. शेतीवर सर्व घर अवलंबून आहे. गावातच राहून, अभ्यास करून हे यश मिळविले. आतापर्यंत सहावेळा प्रयत्न करून आयएएस झालो आहे. मी २०१५ पासून परीक्षा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१८ साली केंद्रीय सशस्त्र पोलीस सेवा, २०२० साली आयपीएस झालो. मात्र, आयएएस होण्याची जिद्द होती. त्यामुळे पुन्हा प्रयत्न करून अखेर आयएएस झालो.

सोहम मानधारे (२६७)

पुणे जिल्ह्यातील पडवी गावात राहतो. आई शिक्षिका आणि वडील शेतकरी आहेत. मी अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर आहे. अभ्यासिकेसह घरी अभ्यास केला. काही विषयात चांगले तर, काही विषयात कमी गुण मिळाले. त्यामुळे १०० क्रमांकाच्या आत स्थान मिळाले नाही. आता भारतीय महसूल सेवेमधील पद मिळेल. पूर्ण वेळ परीक्षेची तयारी करत होतो.

विकल्पा विश्वकर्मा (२७५)

आम्ही मूळचे मध्य प्रदेशातील जबलपूरचे. मात्र, मागील २५ वर्षांपासून पुण्यात राहात आहोत. चार प्रयत्नांनंतर यश मिळाले आहे. काही विषयांचे मार्गदर्शन अभ्यासिकांमधून घेतले तर बहुतांशी तयारी स्वयंअध्ययनच्या माध्यमातून केली. सुरूवातीला दोन वर्षे पुण्यात तर, त्यानंतर दिल्ली येथे जाऊन परीक्षेची तयारी केली. वडील संरक्षण मंत्रालयात आहेत.

हे वाचले का?  अनुसूचित जाती, जमातींतही ‘क्रीमिलेयर’ हवे; घटनापीठातील चार न्यायमूर्तींची महत्त्वाची सूचना

रामेश्वर सब्बानवाड (२०२)

मी मूळचा उदगीरचा असून परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात आलो. दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळाले आहे. परीक्षेची तयारी २०२९ पासून केली तर २०२० ला पहिला प्रयत्न केला आणि मुलाखतीपर्यंत पोहचलो होतो. लातूर येथे आई-वडील, छोटा भाऊ आहे. वडील छोटे किराणा दुकान चालवीतात. मी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर काही विद्यार्थ्यांची शिकवणी घेतली. त्यानंतर मात्र, हे सर्व सोडून स्पर्धा परीक्षेच्या मागे लागलो आणि हे यश मिळविले.

अश्विन गोलपकर (६२६)

मी मूळचा रत्नागिरीचा असून दहावीनंतर ठाण्यात शिक्षणासाठी आलो. अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यानंतर दोन वर्षे नोकरी केली. आतापर्यंत सहा प्रयत्न करून हे यश मिळाले आहे. मी २०१६ पासून परीक्षेची तयारी करत आहे. काही वेळा मुंबई आणि त्यानंतर दिल्लीला अभ्यास केला. यापूर्वी २०१९ मध्येही परीक्षेत यश मिळाले होते. भारतीय व्यापार सेवेत रुजू झालो.

राज्यातील उमेदवारांमध्ये घट?

दरवर्षी राज्यातील साधारण ८० ते १०० उमेदवार यूपीएससीत निवडले जातात. यंदा मात्र साधारण ६० ते ७० उमेदवार दिसत आहेत.

पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये स्थान मिळवणारे पाच ते सहा उमेदवार दिसत आहेत. गेली काही वर्षे राज्यातील पहिल्या शंभरमध्येही साधारण ८ ते १० उमेदवार स्थान मिळवत होते.

हे वाचले का?  IND vs NZ : विराटने शून्यावर बाद होऊनही मोडला धोनीचा मोठा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

राज्यातही मुलींचे प्रमाण यंदा काहिसे वाढले आहे. ग्रामीण भागातील उमेदवारांचे प्रमाण यंदाही अधिक आहे. राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांचे प्रमाणही वाढू लागल्याचे दिसत आहे, अशी निरीक्षणे स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शकांनी नोंदवली.

वडील शासकीय सेवेत असल्याने या सेवेबाबत उत्सुकता होती. नोकरीच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा व्यवस्थेसाठी, समाजासाठी उपयोग करण्याची इच्छा होती. परीक्षेच्या तयारीसाठी वैकल्पिक विषयासाठी ऑनलाइन शिकवणीचा आधार घेतला़  मात्र, बाकी पूर्णपणे स्वयंअध्ययन केले. यशासाठी भरपूर सराव आणि अभ्यासात नियमितपणा आवश्यक आहे. -प्रियंवदा म्हाडदळकर