येवला मुक्तीभूमीत जागतिक दर्जाच्या ग्रंथालयासाठी प्रयत्न

येवला मुक्तीभूमीवर गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या साहित्याचे जागतिक दर्जाचे ग्रंथालय निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

प्रस्ताव सादर करण्याची समाज कल्याण आयुक्तांची सूचना

नाशिक : येवला मुक्तीभूमीवर गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या साहित्याचे जागतिक दर्जाचे ग्रंथालय निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. याबाबत शासनास प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केली आहे. नारनवरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले असून त्यांनी विभागातील विविध योजनांचा आढावा घेत येवला येथील विविध विकास कामांची पाहणी केली.  येवला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारकास डॉ. नारनवरे यांनी शुक्रवारी सकाळी भेट देऊन मुक्तीभूमी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकास कामांचा आढावा घेतला. तसेच शासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून दुसऱ्या टप्प्यात करावयाच्या बांधकाम संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ते बदल सुचविले. तत्पूर्वी समाजकल्याण आयुक्तांनी येवला तालुक्यातील जळगाव देऊर ग्रामपंचायतीस भेट देऊन तेथे मागासवर्गीय महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या पैठणी केंद्राची पाहणी केली.

हे वाचले का?  पेसा भरतीसाठी आदिवासींचा विकास भवनावर मोर्चा; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग

मागासवर्गीय महिलांच्या सर्वागीण विकासासाठी पैठणी निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या समवेत समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, उपायुक्त रवींद्र कदम, साहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, तहसीलदार प्रमोद हिले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मुकेश पवार आदी उपस्थित होते. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेबाबत तसेच राज्यातील विविध महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नाबाबत राज्याचे समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांची भेट घेऊन चर्चा केली. बैठकीत शिष्यवृत्तीसह अन्य विषयांवर चर्चा झाली. करोना काळात आर्थिकदृष्टय़ा खचलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सर्व शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन आणि संस्था प्रमुखांना शासनाच्या निर्देशांचे पालन करून सहकार्य करण्याच्या सूचना विद्यापीठस्तरावरून देण्यात येतील, असे कुलगुरुंनी सांगितले. समाज कल्याण विभागाने समान संधी केंद्राची संकल्पना मांडली आहे. त्यासाठी देखील विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयात समान संधी केंद्र सुरू करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचेही कुलगुरू यांनी नमूद केले. अनुसूचित जाती, नवबौद्ध, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि  इतर मागासवर्गीय घटकातील तरुण आणि महिलांसाठी विशेष कौशल्यावर आधारित वैद्यकीय अभ्यासक्रम राबविण्यासह इतर प्रश्नांबाबत यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

हे वाचले का?  नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा