रस्त्यावर इंधन सांडल्याने वाहनांची घसरण ; सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रकार

रस्त्यावर इंधन पडल्याची कल्पना नसल्याने पाच ते सहा वाहनधारक घसरून पडले.

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील वर्दळीच्या रस्त्यावर गुरुवारी पहाटे इंधन सांडल्याने काही वाहने घसरली. एक वाहनधारक जखमी झाला. धोकादायक बनलेल्या या मार्गावरून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. अग्निशमन दलाने रस्त्याची स्वच्छता केल्यावर मुरूम टाकून वाहतूक पूर्ववत झाली.

कार्बन नाका ते ज्योती स्ट्रक्चर रस्त्यावर हा प्रकार घडला. या भागात गॅस वाहिनीसाठी खोदकाम प्रगतिपथावर आहे. यात कार्यरत जेसीबीतून इंधनाचा डबा पहाटेच्या सुमारास रस्त्यालगत पडल्याचे सांगितले जाते. सांडलेले इंधन रस्त्याजवळील खड्डय़ात गेले. नंतर ते हळूहळू रस्त्यावर आले. औद्योगिक वसाहतीतील हा अतिशय रहदारीचा मार्ग आहे.  शिवाजीनगरसह आसपासच्या भागातील रहिवासी या रस्त्याचा वापर करतात. सकाळी वाहनांद्वारे कामावर जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठी असते

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

रस्त्यावर इंधन पडल्याची कल्पना नसल्याने पाच ते सहा वाहनधारक घसरून पडले. त्यात एक जण जखमी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. स्थानिक नगरसेवक दिनकर पाटील यांनी त्यास दुजोरा दिला. इंधन पसरलेल्या रस्त्यावरून मार्गस्थ होणे वाहनांसाठी धोकादायक होते. या घटनेची माहिती मनपा अधिकारी आणि पोलीस यंत्रणेला देण्यात आली. त्यानंतर रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली.  अग्निशमन दलाच्या बंबाने पाण्याचे फवारे मारून साफसफाई केली. इंधनयुक्त रस्त्यावर मुरूम टाकून तो सकाळी १० वाजता वाहतुकीला खुला करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी मनपाचे विभागीय अधिकारी नितीन नेर, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर आदी उपस्थित होते.