राज ठाकरे मार्च महिन्यात अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसेने दिलीय
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि उद्धव यांचे चुलत बंधू राज ठाकरेही अयोध्येला जाणार आहे. १ मार्च ते ९ मार्चच्या दरम्यान एखाद्या दिवशी राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असून ते रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. आज मुंबईमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. याचसंदर्भात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्यांनी मी सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे, असं उत्तर दिलं.
राज ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत फडणवीस यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी, “मी सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे,” असं उत्तर दिलं. अहमदनगरमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे कृषी विधेयकाविरोधात उपोषण करण्याच्या तयारीत आहे. अण्णांच्या मनधरणीसाठी फडणवीस आज राळेगणसिद्धीला गेले आहेत. यावेळी त्यांना राज यांच्या दौऱ्यासंदर्भात प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे, असं ते म्हणाले.
मनसेचं हिंदुत्ववादी राजकारण
राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल प्रमुखविरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाने अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्णाम झालेली ही हिंदुत्ववादी पक्षाची जागा भरुन काढण्याच्या दृष्टीकोनातून मनसेने आपला पुढचा राजकीय प्रवास सुरु केल्याचे चित्र मागील काही महिन्यांपासून दिसत आहे असं अनेक राजकीय जाणाकार सांगतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करुन सत्तेत आलेली शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मवाळ झाल्याची टीका मागील एका वर्षामध्ये भाजपाने अनेकदा केली आहे. त्यातच आता राम मंदिराच्या बांधकामासाठी निधी संकलन सुरु झालं असल्याने अयोध्या राम मंदिराचा मुद्दाही चर्चेत आहे. दुसरीकडे मनसे आणि भाजपा एकत्र येण्यासंदर्भातील बातम्या अनेकदा चर्चेत असतात. याच सर्व पार्श्वभूमीवर हिंदुत्वावादी मतदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने मनसेचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते. अयोध्या दौऱ्यानंतर म्हणजेच ९ मार्च नंतर राज ठाकरे राज्यभरामध्ये दौरा करणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
उद्धव यांनी मागच्या वर्षी केला अयोध्या दौरा
मागच्या वर्षी सात मार्चला मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेना अयोध्येमध्ये शक्तीप्रदर्शन केलं होतं. लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेने अनेकदा भाजपची कोंडी करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा लावून धरला होता. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर राम मंदिराचा प्रश्न सुटला. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून शिवसेनेची कोंडी होतानाचे चित्र पहायाला मिळाल. निवडणुका झाल्यानंतर अयोध्येला जाण्याचे ठाकरे यांनी जाहीर केले होतं. सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेने हिंदूुत्वाची भूमिका मवाळ केल्याची चर्चा सुरू झाली होती. याच सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा केला होता.