राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे नाशिक मध्ये रस्त्यांच्या डांबरीकरणाला वेग

रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे पोहोचला असताना महानगरपालिका प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याच्या कामात मात्र तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे.

नाशिक-खड्डे बुजविणे आणि रस्ते दुरुस्तीचे काम विहित मुदतीत करण्याचे निर्देश यावेळी ठेकेदारांना देण्यात आले. मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक शहरात येणार आहेत. त्र्यंबक रस्त्यावरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आदिवासी जनजातीय गौरव व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन उभयतांच्या उपस्थितीत होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम विभागातील मोडक पॉइंट सिग्नल (पिनॅकल मॉल) चौकात तातडीने डांबरीकरण करण्यात आले. राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे का होईना खड्डेमय मार्गाचे भाग्य उजळल्याची नागरिकांची भावना आहे. अन्य मार्गांच्या दुरुस्तीकडे तितक्याच तत्परतेने व गांभिर्याने पहावे असे वाहनधारक सुचवतात.

हे वाचले का?  मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई

याच विभागातील रविवार कारंजा जवळ अहिल्याबाई होळकर पूलालगत रस्ता दुरुस्ती करण्यात आली. सातपूर विभागात प्रभाग क्रमांक ११ पुलावरील दुरुस्तीचे काम करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अंबड औद्योगिक वसाहतीतील मुंगी अभियांत्रिकी कंपनीलगतच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

रस्ते दुरुस्तीसाठी ३० नोव्हेंबरची मुदत
बैठकीत मक्तेदारांना दोष निवारण कालावधीत रस्ते निविदा अटी-शर्तीनुसार गुणवत्तापूर्ण काम करण्याची सूचना करण्यात आली. दिलेल्या मुदतीत ते पूर्ण करावे, असेही सूचित करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सुचनेनुसार सहाही विभागात रस्ते दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत. ही सर्व कामे उत्कृष्ट दर्जाची असावीत, अशी ताकीद आयुक्तांनी यापूर्वीच दिली आहे. ३० नोव्हेंबरपूर्वी खड्डे बुजवण्याची तसेच दोष निवारण कालावधीत रस्ते दुरुस्तीचे निर्देश शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिले. सर्व मक्तेदारांना लिखीत आदेश देऊन जागांची यादी देऊन कामाची गुणवत्ता राखण्याची सुचना करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुण नियंत्रण विभाग आणि बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी डांबर प्रकल्पास भेट देऊन नमुन्यांची तपासणी केली आहे.

हे वाचले का?  नाशिक: विद्यार्थी नवीन गणवेशापासून वंचित, जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभाग