‘राज्यपालांशी खुला संघर्ष’

गोगोई हे राज्यसभा सदस्य असल्याने त्यांनी टीका करणे आश्चर्यकारक आहे.

नाशिक : मंत्रिमंडळाच्या शिफारसी राज्यपालांवर बंधनकारक असतात; परंतु ते राजकीय दबावाखाली काम करत आहेत. राज्यपालांसोबत शीतयुद्ध नव्हे, तर खुले युद्ध असल्याचे शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी येथे सांगितले.

रविवारी सकाळी शिवसेनेच्या शालिमार येथील नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन राऊत यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडले. विमान प्रवासावरून निर्माण झालेल्या वादानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य केले आहे. विधान परिषदेतील १२ आमदारांची नियुक्ती अद्याप झालेली नाही. हा धागा पकडून राऊत यांनी मंत्रिमंडळाच्या शिफारसी स्वीकारणे राज्यपालांना बंधनकारक असते, असे नमूद के ले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री पांघरूण घालणार नाहीत. त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यातून सत्य बाहेर येईल. अलीकडच्या काळात चारित्र्यहनन करायचे, बदनामी करायची असे प्रकार वाढीस लागले आहेत. सरकारला त्रास द्यायचा, जेणेकरून ते अडचणीत येईल; परंतु विरोधी पक्षांनी दिशा ठरविली तसे होत नाही. उपरोक्त प्रकरणाची कायद्यानुसार चौकशी होईल, असे राऊत यांनी सांगितले.

हे वाचले का?  LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

राज्यसभा सदस्य रंजन गोगोई यांनी न्यायव्यवस्थेसंबंधी केलेल्या विधानांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. गोगोई हे राज्यसभा सदस्य असल्याने त्यांनी टीका करणे आश्चर्यकारक आहे. उलट त्यांनी  ते न्यायाधीश असताना घडलेल्या सर्व घटना आता समोर आणल्या पाहिजेत, असे राऊत म्हणाले. करोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून शिवजयंतीच्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आल्याचे समर्थन त्यांनी केले.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव

नाशिक दौऱ्यात राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भेटीत चर्चा झाल्याचे सांगितले जाते.