आवक वाढल्याने दरात घट; महिनाभर किंमत घसरणीची शक्यता
नवीन गरवी कांद्याचा (उन्हाळी कांदा) हंगाम सुरू झाला असून घाऊक बाजारात गरवी कांद्याची मोठी आवक होत आहे. आवक वाढल्याने घाऊक बाजारात एक किलो कांद्याला दहा ते तेरा रुपये असा दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची विक्री वीस ते पंचवीस रुपये दराने केली जात आहे. पुढील महिनाभर कांदा दरातील घट कायम राहणार असल्याची शक्यता कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
पुणे बाजार समितीच्या श्री शिवाजी मार्केटयार्डात दररोज पन्नास ट्रक कांद्याची आवक होत आहे. पुणे, सातारा तसेच नगर जिल्ह््यातून कांद्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात नवीन कांद्याला प्रतवारीनुसार १०० ते १३० रुपये असा दर मिळाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला ३०० ते ३५० रुपये असा दर मिळाला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याचे दर कमी होत चालले आहेत. पुढील महिनाभर कांदा दरातील घट कायम राहणार आहे, अशी माहिती मार्केटयार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.
लासलगावमध्येही मोठा साठा…
राज्यातील कांद्याची सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये दररोज २२ ते २३ हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. यामध्ये लाल कांद्याची आवक मोठी होत असून बाजारात २० हजार क्विंटल एवढी आवक होत आहे. उन्हाळी कांद्याची आवक वाढली असून दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल एवढी आवक होत आहे. घाऊक बाजारात लाल कांद्याला ९०१ रुपये (क्विंटल) असा दर मिळाला आहे. उन्हाळी कांद्याला ९५० रुपये असा दर मिळाला आहे. घाऊक बाजारात एक किलो कांद्याला नऊ रुपये असा दर मिळाला असून किरकोळ बाजारात वीस रुपये किलो दराने कांद्याची विक्री केली जात आहे.
वेगळी कारणे…
महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिणेकडून मोठी मागणी असते. यंदा कर्नाटकात कांद्याचे उत्पादन चांगले आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रातील कांद्याला असणारी मागणी आता कमी झाली आहे. केरळमधून महाराष्ट्रातील कांद्याला मागणी आहे. गुजरातमध्ये कांद्याची लागवड चांगली झाली आहे. गुजरात, कर्नाटकातील कांदा बाजारात विक्रीस पाठविण्यात येत असल्याने कांदा दरात घट झाली आहे.
ठाणे, मुंबईत २० रुपये किलो
वाशीतील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. दररोज १०० ते ११० गाड्यांमधून कांदा विक्रीस पाठविला जात आहे. घाऊक बाजारात एक किलो कांद्याला १० ते १४ रुपये असा दर मिळाला आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरांत किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची विक्री २० रुपये दराने केली जात आहे.