राज्यसेवा परीक्षेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, वैद्यकीय पात्रतेच्या आधारे…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि उमेदवारांच्या निवडीसंदर्भात बदल करण्यात आला आहे.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि उमेदवारांच्या निवडीसंदर्भात बदल करण्यात आला आहे. आता मुलाखतीसाठी निवडलेल्या सर्व उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जाणार असून, वैद्यकीय पात्रतेच्या आधारे उमेदवारांची पात्रता-अपात्रता विचारात घेऊन शिफारसपात्र उमेदवारांची निवडयादी तयार केली जाणार आहे. 

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. गेली काही वर्षे अंतिम निकालाद्वारे शिफारस केलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत होती. मात्र उमेदवारांच्या शिफारसीनंतर नियुक्तीच्या वेळी वैद्यकीय तपासणीमध्ये उमेदवार शिफारसपात्र पदासाठी अपात्र ठरल्यास उमेदवाराची अन्य पदावर निवड होऊ शकत नाही. तसेच अन्य पदासाठी आवश्यक गुण असूनही उमेदवार निवड प्रक्रियेतून बाद ठरतो. या अनुषंगाने राज्यसेवा परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी निवड झालेल्या सर्व उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करून आलेला वैद्यकीय अहवाल आणि उमेदवारांनी दिलेला पदांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन अंतिम शिफारस करणे शक्य होण्यासाठी वैद्यकीय चाचणीसंदर्भातील कार्यपद्धती बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे वाचले का?  Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना एमपीएससीकडून वैद्यकीय चाचणीसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी पुरेशी विभागीय वैद्यकीय मंडळे स्थापन करून वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात येईल. त्यासाठी एमपीएससीकडून आवश्यक सूचनांसह वैद्यकीय तपासणीपत्र ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांना देण्यात येईल. वैद्यकीय मंडळासमोर तपासणीसाठी प्रतिदिन पाठवल्या जाणाऱ्या उमेदवारांची संख्या एमपीएससीकडून निश्चित करण्यात येईल. वैद्यकीय तपासणी अहवालावर उमेदवाराला दाद (अपील) मागायची असल्यास त्यासाठी एमपीएससीकडून सात दिवसांचा कालावधी उपलब्ध करून दिला जाईल. दाद मागण्यासाठी उमेदवाराच्या खात्यात अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची सुविधा देण्यात येईल.

हे वाचले का?  सांगली जिल्ह्यातील ७९ गावांत ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम, यावर्षी नव्या २२ गावांची भर

मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अपिलीय वैद्यकीय मंडळाची शासनाकडून स्थापना करण्यात येईल. वैद्यकीय तपासणी अहवालावर दाद मागितलेल्या सर्व उमेदवारांना मंडळासमोर तपासणीसाठी बोलावले जाईल. विभागीय वैद्यकीय मंडळ आणि अपीलीय मंडळाने सादर केलेल्या वैद्यकीय तपासणी अहवाल विचारात घेऊन उमेदवार ज्या संवर्गात वैद्यकीय, शारीरिक आणि शैक्षणिक निकषानुसार पात्र असेल त्याच संवर्गासाठी उमेदवाराला पसंतीक्रम सादर करण्याची मुभा एमपीएससीकडून दिली जाईल. मुलाखतीपूर्वीच उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केल्यापासून नियुक्ती देण्याचा कालावधी एक वर्षापेक्षा जास्त झाल्यास शिफारसपात्र उमेदवारांची नियुक्तीपूर्वी पुन्हा वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असेल, असे नमूद करण्यात आले आहे.

हे वाचले का?  Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार