राज्यात अडीच लाख हेक्टर शेतीला पावसाचा तडाखा; विदर्भ, मराठवाड्यात शेतीचे मोठे नुकसान

पुराचे पाणी शेतात घुसून सुमारे दीड हजार हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेली

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सक्रिय झालेल्या मोसमी पावसाचा मोठा तडाखा राज्यातील शेतीला बसला आहे. सुमारे २ लाख ३३ हजार ८९७ हेक्टरवरील खरीप हंगामातील पेरण्यांसह, नगदी पिके आणि फळबागांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी शेतात घुसून सुमारे दीड हजार हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेली आहे. ही प्राथमिक माहिती असून, नुकसानीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय झालेले नुकसान –

राज्याच्या कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार १३ जुलैपर्यंत १६ जिल्ह्यांतील २ लाख ३३ हजार ८९७ हेक्टरला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. जिल्हानिहाय विचार करता, रायगड जिल्ह्यातील १०५ हेक्टर, रत्नागिरीतील तीन हेक्टर, धुळ्यात २,१८० हेक्टर, जळगावात ३४ हेक्टर, हिंगोलीत १५,९४४ हेक्टर, लातूरमध्ये १५ हेक्टर, नांदेडमध्ये ३६,१४४ हेक्टर, अकोल्यात ८६४ हेक्टर, अमरावतीत २७,१७० हेक्टर, यवतमाळमध्ये १२,२११३ हेक्टर, वर्ध्यात १६,१८७ हेक्टर, गोंदियात एक हेक्टर, नागपूरमध्ये १,९७४ हेक्टर, भंडाऱ्यात ३० हेक्टर, गडचिरोलीत ७४० हेक्टर आणि चंद्रपूरमध्ये १०,३९३ हेक्टर, असे एकूण २ लाख ३३ हजार ८९७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान नांदेड, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत झाले आहे.

हे वाचले का?  अहमदनगरची अक्षता जाधव अबॅकस परीक्षेमध्ये राज्यात दुसरी

सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका-

नदी, ओढ्याच्या पुराचे पाणी शेतजमिनीत घुसून १ हजार ५४६ हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेली आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक ११४९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. त्या खालोखाल नांदेडमधील १९५ हेक्टर, यवतमाळमधील १४२ हेक्टर, नागपूरमधील ५८ हेक्टर आणि रायगडमधील तीन हेक्टरचा समावेश आहे. खरीप हंगामात पेरणी झालेल्या सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्या खालोखाल कापूस, भात, कडधान्य पिकांचा समावेश आहे. अमरावतीत संत्रा पिकाला दणका बसला आहे.

हे वाचले का?  Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”

उशिराने आला धुवून घेऊन गेला –

यंदा पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे खरीप पेरण्या मुळात उशिराने झाल्या होत्या. पिकांची उगवण सुरू होताच धो-धो पावसात पिके बुडून गेली. पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे कोवळे कोंब जळून गेले आहेत. संत्रा, हळद, केळी, उसासारखी नगदी पिके अतिरिक्त पाण्यामुळे पिवळी पडली आहेत. नदी, ओढ्यांचे पुराचे पाणी शेतजमिनीत घुसून शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. त्या पुन्हा लागवडीखाली आणणे अत्यंत खर्चिक ठरणार आहे. त्यामुळे पाऊस येऊनही शेतकरी आणि शेतीचे नुकसानच करून गेला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील खरीप पेरण्या ६० टक्क्यांवर गेल्या होत्या. यापैकी बहुसंख्य क्षेत्राचे नुकसानच झाले आहे. अनेक ठिकाणी पिके धुवून गेल्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे. शेतकरी आता पेरणी न करता रब्बी हंगामाच्याच तयारीला लागतील, असे चित्र आहे. त्यामुळे खरिपातील उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live: ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “त्याला पाच कोटी आणि…”

आकडे सांगतात नुकसानीचे गांभीर्य –

खरिपातील लागवडीखालील एकूण क्षेत्र १५१.३३ लाख हेक्टर
सुमारे ६० टक्के क्षेत्रावर झाली होती पेरणी
२ लाख ३३ हजार ८९७ हेक्टरला बसला अतिवृष्टीचा फटका