राज्यात करोना रुग्णवाढ, उपचाराधीन रुग्णांची संख्या १,४८९ वर

ज्यात करोना रुग्णांचे प्रमाण गेल्या महिन्याच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढले आहे.

मुंबई, नवी दिल्ली : राज्यात करोना रुग्णांचे प्रमाण गेल्या महिन्याच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढले आहे. गेले काही महिने रुग्ण आढळण्याचा दर ०.५३ टक्के होता, मात्र गेल्या आठवडय़ात तो ३.५१ टक्क्यांवर पोहोचला. विविध जिल्ह्यांमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या १४८९ झाली आहे. गेल्या महिन्यात ही संख्या सुमारे ७०० होती.

दरम्यान, करोनाचा नवा उपप्रकार ‘एक्सबीबी.१.१६’चे आढळलेले ६१० रुग्ण हे देशभर अलीकडे झालेल्या रुग्णवाढीमागील कारण असू शकते, असे ‘इन्साकॉग’च्या अहवालात म्हटले आहे. करोनाच्या नव्या उपप्रकाराचे रुग्ण ११ राज्यांत आढळले आहेत. त्यापैकी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सर्वाधिक प्रत्येकी १६४ रुग्ण आढळले. त्या पाठोपाठ तेलंगणात ९३ आणि कर्नाटकमध्ये ८६ रुग्णांचे निदान झाले. ‘एक्सबीबी.१.१६’ या करोना उपप्रकाराचे दोन रुग्ण जानेवारीत आढळले होते.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर

करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र सरकार अधिकाधिक चाचण्यांवर भर देत आहे. राज्यात सध्या दररोज सरासरी ५,८८२ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. राज्यात बधितांचे सर्वाधिक २० टक्के प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात आहे. त्याखालोखाल पुणे ९.२ टक्के, औरंगाबाद ९ टक्के, कोल्हापूर ८.७ टक्के, नगर ८.४ टक्के, सांगली ७.८ टक्के आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

हे वाचले का?  भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी? श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुतेंचा निर्धार, “पक्षाला ताकद दाखवणार”

देशात १८०५ नवे रुग्ण

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशात १,८०५ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच १३४ दिवसांनंतर प्रथमच उपचाराधीन रुग्णांची संख्या १० हजारांहून अधिक झाली आहे.