राज्यात कांदादर निम्म्यावर

नव्या कांद्याच्या हंगामामुळे जुना कांदा मोठय़ा प्रमाणात बाजारात

नव्या कांद्याच्या हंगामामुळे जुना कांदा मोठय़ा प्रमाणात बाजारात

पुणे/ठाणे/नाशिक :  गेल्या काही महिन्यांपासून चढय़ा दरांमुळे स्वयंपाकात जपून वापरला जाणारा कांदा आता मुबलक वापरता येणार आहे.  पुणे, वाशी, नाशिकसह राज्यातील बाजारसमित्या तसेच उपबाजारात जुन्या कांद्याची मोठी आवक आहे. नवीन कांद्याचा हंगाम सुरू झाल्यामुळे साठवणूक करण्यात आलेला जुना कांदा शेतकरी बाजारात विक्रीस पाठवीत आहेत. परिणामी, महिनाभरापूर्वी तेजीत असलेल्या जुन्या कांद्याच्या दरात निम्म्याने घट झाली आहे.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात नवीन हळवी कांद्याची (लाल कांदा) आवक सुरू होते. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन कांद्याचे मोठे नुकसान झाले होते. नवीन कांद्याची रोपे शेतातून वाहून गेली होती. शेतक ऱ्यांनी अशा परिस्थितीत नवीन कांद्याची लागवड केली. नवीन कांद्याचे पीक हाताशी आले असून तो बाजारात पाठवण्यासही सुरुवात झाली आहे.

मध्यंतरी नवीन कांद्याची आवक लांबणीवर पडल्याने जुना कांद्याला चांगले भाव मिळाले होते. जुन्या कांद्याची मोठय़ा प्रमाणावर साठवणूक करण्यात आली होती. मात्र, साठवणुकीतील जुन्या कांद्याची प्रतवारी तितकीशी चांगली नसल्याने नवीन कांदा बाजारात दाखल होण्यापूर्वीच शेतक ऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर जुना कांदा विक्रीस पाठविला आहे. गेल्या चार दिवसात बाजारात २०० ट्रक एवढी कांद्याची आवक झाली, असे पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

हे वाचले का?  नाशिक: मुक्त विद्यापीठाकडून ३० दिवसांच्या आत निकाल जाहीर

जुन्या कांद्याची प्रतवारी चांगली नाही. पंधरा दिवसानंतर बाजारात फक्त नवीन कांदाच पाहायला मिळेल. त्यामुळे सध्या मोठय़ा प्रमाणावर जुना कांदा विक्रीस पाठविण्यात येत आहे, असे पोमण यांनी सांगितले.

कारण काय?

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटकातून येत्या काही दिवसात नवीन कांद्याची आवक सुरू होईल.  त्यानंतर आत्ता आहे त्याहून किंमत कमी होईल.  त्यामुळे साठवणुकीतील कांद्याला फारसे दर मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेतक ऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर जुना कांदा विक्रीस पाठविला आहे.

अटकळ आणि परिस्थिती..

हे वाचले का?  नाशिक: मुक्त विद्यापीठाकडून ३० दिवसांच्या आत निकाल जाहीर

दिवाळीनंतर जुन्या कांद्याला उच्चांकी दर मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. कांद्याला शंभर रुपये किलो असा दर मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. दिवाळीपूर्वी घाऊक बाजारात शेतकऱ्यांना ५० ते ७० रुपये किलो असा दर मिळत होता. सध्या ३५ ते ४५ रुपये असा दर मिळत आहे. पंधरा दिवसांनंतर चांगल्या प्रतीच्या वाळवलेल्या नवीन कांद्याला मागणी राहणार आहे, असे कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी नमूद केले.

वाशी बाजारात काय?

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवडय़ापासून नवीन कांद्याची आवक वाढली आहे. बाजारात आठ दिवसात २८ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यापैकी पाच हजार ६०० क्विंटल एवढा जुना कांदा होता. घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ३५०० ते ४५०० रुपये या दराने जुन्या कांद्याची विक्री होत आहे.

लासलगावची स्थिती..

नाशिक जिल्ह्य़ातील लासलगाव बाजार समितीमध्ये गेल्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात जुना कांदा पाठवला. या बाजार समितीमध्ये या कालावधीत तीन लाख १३ हजार ५३९ क्विंटल एवढा जुना कांदा विक्रीसाठी आला. तसेच नवीन कांद्याचीही  आवक बाजार समितीमध्ये सुरू झाली असून ११ हजार १६१ क्विंटल एवढा नवा कांदा लासलगाव येथे आल्याचे सांगण्यात आले.

हे वाचले का?  नाशिक: मुक्त विद्यापीठाकडून ३० दिवसांच्या आत निकाल जाहीर

किरकोळ बाजारातील दर

नवीन कांदा :   ४० ते ५० रुपये किलो

जुना कांदा  ५० ते ६० रुपये किलो