राज्यात पुढील चार दिवस पावसाचे ; महाराष्ट्रातही मोसमी वारे लवकरच धडकण्याची चिन्हे

येत्या तीन ते चार दिवस राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पुणे : यंदा तीव्र उन्हाळा अनुभवल्यानंतर हव्याहव्याशा वाटणाऱ्या गारव्याची चाहूल लवकर मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी अंदमानात मोसमी पावसाचे (नैर्ऋत्य मोसमी वारे) आगमन झाले. सहा दिवस आधीच मोसमी पाऊस अंदमानात पोहोचला आहे. परिणामी महाराष्ट्रात देखील नैर्ऋत्य मोसमी वारे लवकरच धडकण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, येत्या तीन ते चार दिवस राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

येत्या चारपाच दिवसांत, २१ मेपर्यंत दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच सुमारास मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी उष्ण लाट येण्याची शक्यता आहे.

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; अजित पवार गट नाराज? म्हणाले, “आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं”

गुरुवारी (१९ मे) मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे, मराठवाडय़ातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद, कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २० आणि २१ मे रोजी विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ जिल्ह्यांत एकदोन भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आग्नेय अरबी समुद्रात वादळी वाऱ्यासह (वाऱ्याचा वेग ताशी ४०-५० किलोमीटर प्रतितास ते ६० कि.मी.) होण्याची शक्यता आहे.

हे वाचले का?  Badlapur School Crime Case Live Updates: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!

दरम्यान, मंगळवारी सायंकाळपर्यंत उस्मानाबादमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, तर सातारा, सांगली, कोल्हापूर येथे सोसाटय़ाच्या वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी वगळता इतरत्र पावसाची नोंद करण्यात आली नाही. सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे ४५ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १८.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले.

आज जलधारांचा अंदाज..

बुधवारी (१८ मे) विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडय़ातील उस्मानाबाद, नांदेड, लातूर या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.