राज्यात लसीकरणाला कमी प्रतिसाद

लशीची सुरक्षितता, परिणामकारकतेबाबत साशंकता, अ‍ॅपमधील त्रुटींचा परिणाम

लशीची सुरक्षितता, परिणामकारकतेबाबत साशंकता, अ‍ॅपमधील त्रुटींचा परिणाम

करोना प्रतिबंध लशीची सुरक्षितता, परिणामकारकतेबाबत साशंकता आणि अ‍ॅपच्या माध्यमातून तयार होणाऱ्या लाभार्थीच्या यादीतील त्रुटी यामुळे लसीकरणास अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र राज्यभर आहे.

राज्यात लसीकरणाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी उद्दिष्टाच्या ६४ टक्के लसीकरण झाले, तर मंगळवारी ५० टक्के लक्ष्य साधले गेले. बुधवारी त्यात पुन्हा वाढ होत ६८ टक्के नोंदले असून १८ हजार १६६ कमर्चाऱ्यांना लस देण्यात आली. मुंबईत सलग तिन्ही दिवशी उद्दिष्टाच्या ५० ते ५२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मुंबईत बुधवारी ३३०० लाभार्थ्यांपैकी १७२८ जणांना लस दिली गेली.

‘कोव्हॅक्सीन’ लशीला मान्यता मिळाली असली तरी इतर राज्यांमध्ये चाचणीच्या टप्प्यात आढळलेल्या दुष्परिणांमुळे आरोग्य कमर्चाऱ्यांमधील भीती अजूनही कायम आहे. त्यात मागील तीन दिवसांत लस घेतलेल्यांमधील काही जणांमध्ये ताप, अंगदुखी इत्यादी सौम्य प्रतिकूल परिणामही दिसून येत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधील भीती आणखी वाढली आहे. काही कमर्चारी यादीत नाव असूनही लसीकरणास येण्यास तयार नाहीत. यासाठी आता प्रत्येक लसीकरण केंद्रावर जाऊन जनजागृती करण्यास आम्ही सुरुवात केली आहे, अशी माहिती सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जामदार यांनी दिली.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल”, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

लशीमुळे काही दुष्परिणाम होतील का ही भीती असल्याने आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका यासह चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांचा अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद आहे. डॉक्टरांनी पुढाकार घेऊन लस घेतल्यास यांचे मनोबल वाढेल आणि या वर्गातील लसीकरणाबाबतची भीती दूर होईल असे मत औरंगाबाद पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पडाळकर यांनी व्यक्त केले.

साताऱ्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी सांगितले की, ‘अ‍ॅपमधून लाभार्थीची यादी रात्री उशिरा तयार होते. त्यानंतर लाभार्थीना लसीकरणासाठी दुसऱ्या दिवशी येण्याचे संदेश जातात. ऐनवेळी संदेश मिळाल्यानेही लाभार्थीना त्यांच्या कामाचे नियोजन करून लसीकरणासाठी येणे शक्य होत नाही. काही वेळस कमर्चारी बाहेरगावी गेले असतात. त्यामुळे याद्यांबाबत नीट नियोजन करण्याची गरज आहे.

हे वाचले का?  धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण? ‘धनगड’ प्रमाणपत्रे रद्द; शिंदे समितीचा अहवाल सादर

कुठे किती? : राज्यात एकूण ५१ हजार ६६० व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. बुधवारी अमरावती (११२ टक्के), हिंगोलीत (१०७ टक्के) उद्दिष्टापेक्षा अधिक लसीकरण झाले. त्याखालोखाल धुळे (९२ टक्के), पालघर (९० टक्के), वर्धा (९१ टक्के), मुंबई उपनगर (८२ टक्के), उस्मानाबाद (८० टक्के), भंडारा (८० टक्के) येथे नोंदवण्यात आले. तर उद्दिष्टाच्या सर्वात कमी लसीकरण औरंगाबाद (३१ टक्के), सांगली (४० टक्के), गडचिरोली (४६ टक्के) येथे झाले आहे.

दोन्ही लशींमध्ये भेदभाव नको -आरोग्यमंत्री

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींची पूर्ण तपासणी केल्यानंतर आपत्कालीन वापरास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे या दोन्ही लशी सुरक्षित आहेत. कोव्हॅक्सिन घेतलेल्यांपैकी एकालाही सौम्य दुष्परिणाम आढळलेला नाही. त्यामुळे याबाबत भेदभाव आणि संभ्रम निर्माण करू नये. पुढच्या काळात आणखी काही लशी येण्याची शक्यता आहे. तेव्हा लसीकरणाला योग्य प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य कमर्चाऱ्यांना केले आहे.

हे वाचले का?  पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शन रांगेसाठी ‘ स्कायवॉक ‘, १२९ कोटी खर्चाच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता

‘कोव्हॅक्सिन’ची भीती कायम

‘कोव्हॅक्सिन’ लशीबाबतची भीती अजूनही असून बुधवारी १०० पैकी केवळ १५ जण लसीकरणासाठी आले होते. राज्यात बुधवारी ३१२ जणांना ही लस दिली असून आत्तापर्यंत ८८१ जणांनी ही लस घेतली आहे.