राज्यात विजेची मागणी पुन्हा वाढली

पंखे, वातानुकूलित यंत्रासह कृषीपंपाचा वापर वाढल्याने राज्यातील विजेची मागणी वाढून गुरुवारी (१० ऑगस्ट) दुपारी ४ वाजता २४ हजार ६२८ मेगावॅट नोंदवली गेली.

लोकसत्ता टीम

नागपूर : राज्यातील काही भागात पावसाने उसंत घेतल्याने तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे पंखे, वातानुकूलित यंत्रासह कृषीपंपाचा वापर वाढल्याने राज्यातील विजेची मागणी वाढून गुरुवारी (१० ऑगस्ट) दुपारी ४ वाजता २४ हजार ६२८ मेगावॅट नोंदवली गेली.

राज्याच्या बऱ्याच भागात मध्यंतरी चांगला पाऊस पडला. त्यामुळे विजेची मागणी २१ हजार ते २३ हजार मेगावॅट दरम्यान होती. परंतु, आता गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या बऱ्याच भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी ४ वाजता राज्यात विजेची मागणी २४ हजार ६२८ मेगावॅटवर गेली असून त्यापैकी १६ हजार २८१ मेगावॅट विजेची निर्मिती राज्यात होत होती. सर्वाधिक ६ हजार ६९२ मेगावॅट वीजनिर्मिती महानिर्मितीकडून केली जात होती. त्यात औष्णिक विद्युत प्रकल्पातून ६ हजार १६६ मेगावॅट, जलविद्युत प्रकल्पातून ४८९ मेगावॅट, सौरऊर्जा प्रकल्पातून ३७ आणि इतर प्रकल्पातून वीजनिर्मिती होत होती, तर अदानीकडून २ हजार ९११ मेगावॅट, जिंदलकडून ३१५ मेगावॅट, आयडियलकडून २६१ मेगावॅट, रतन इंडियाकडून १ हजार ७० मेगावॅट वीजनिर्मिती होत होती.

हे वाचले का?  Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?

केंद्र सरकारच्या वाट्यातून राज्याला ८ हजार ३१६ मेगावॅट वीज मिळत होती. यावेळी मुंबईतही ३ हजार २१९ मेगावॅट विजेची मागणी नोंदवली गेली. विजेची मागणी वाढल्याच्या वृत्ताला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.