राज्यातील रुग्णसंख्येत वाढ ; आठवडाभरात ४४ टक्क्यांनी रुग्ण वाढले; संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाचा कृती आराखडा

राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येने सुमारे १५० चा टप्पा पार केला आहे. परिणामी नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही आठवडाभरात हजाराच्या घरात गेली आहे.

मुंबई : राज्यात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत आठवडाभरात सुमारे ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ मुंबईत झाली असून त्याखालोखाल पुणे, ठाणे, धुळे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला असून यामध्ये जनुकीय चाचण्यांवर भर देण्यात येणार आहे.

राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येने सुमारे १५० चा टप्पा पार केला आहे. परिणामी नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही आठवडाभरात हजाराच्या घरात गेली आहे. राज्यात १३ ते १९ एप्रिलच्या आठवडय़ात ७१७ नवे रुग्ण आढळले होते. यात सर्वाधिक म्हणजे ३९० रुग्ण मुंबईत आढळले होते. आठवडय़ात म्हणजेच २० ते २६ एप्रिल दरम्यान नव्याने आढळलेल्या रुग्णांच्या संख्येत भर पडून ती १०३७ झाली आहे. मुंबईतील रुग्णांचे प्रमाण ५४९ पर्यंत वाढले असून ठाण्यातही काही अंशी रुग्णवाढ झाली आहे. आठवडाभरात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ६५ वरून ९७ झाली आहे.

हे वाचले का?  Creamy Layer : “अनुसूचित जातींचे आरक्षण हळूहळू संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट”, क्रिमीलेअरबाबत प्रकाश आंबेडकरांची सूचक पोस्ट

एकाच ठिकाणी अधिक रुग्ण आढळल्यास जनुकीय चाचण्या करण्याच्या सूचना

रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्ह्यांना दिले आहेत. चाचण्यांची संख्या तातडीने दुपटीने वाढवावी. तीन ते सात रुग्ण एकाच ठिकाणी आढळत असल्यास या रुग्णांचे नमुने जनुकीय चाचण्यांसाठी पाठवावेत. हवा खेळती नसलेल्या सिनेमागृह, सभागृह, कार्यालये अशा ठिकाणी मुखपट्टी वापराबाबत जनजागृती करण्यावर भर द्यावा असे या आराखडय़ात नमूद केले आहे. प्राणवायू निर्मितीच्या ज्या पीएसए प्रकल्पाचे बांधकाम अपूर्ण राहिले आहे, ते प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही यात देण्यात आल्या आहेत.

हे वाचले का?  Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही भर

दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे गेल्या महिनाभरात हजाराच्याही खाली आलेली उपचाराधीन रुग्णांची संख्या पुन्हा हजाराच्या दिशेने जात आहे. सध्या राज्यात ९६१ रुग्ण उपचाराधीन आहेत. सर्वाधिक ५६२ रुग्ण मुंबईत आहेत, त्या खालोखाल पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.

करोनाव्यतिरिक्त इतर आजारांच्या सेवांचे नियोजन

आराखडय़ाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णालयातील प्राणवायूच्या साठय़ांवर भर दिला जाणार आहे. रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाल्यास करोनाव्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णसेवाही कशा सुरू राहतील त्याचे नियोजन तयार ठेवण्याचे सूचित करण्यात आले आहे. विद्युत आणि अग्निशमन व्यवस्थांच्या लेखापरीक्षणांमध्ये रुग्णालयात आढळलेल्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जावा, असे यात स्पष्ट केले आहे.

लसीकरणावर भर देणे गरजेचे

सर्व वयोगटातील लसीकरणामध्ये देशाच्या सरासरीच्या तुलनेत कमी लसीकरण राज्यात झाले आहे. त्यामुळे लसीकरण वाढविण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे आराखडय़ात अधोरेखित केले आहे.

हे वाचले का?  Sanjay Shirsat: भरत गोगावलेंचं मंत्रीपद संजय शिरसाटांमुळे हुकलं? ‘या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण; शिंदे गटातली धुसफूस चव्हाट्यावर!

चार टक्के रुग्ण रुग्णालयात

राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या सुमारे चार टक्के म्हणजे ३७ रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. यातील १ टक्का म्हणजेच १२ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.