राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या आधी पंतप्रधान मोदींचा देशवासीयांना संदेश; म्हणाले, “आजपासून मी..!”

पंतप्रधान मोदी म्हणाले, “शास्त्रांमध्ये व्रत आणि कठोर नियम सांगितले आहेत. या नियमांचं प्राणप्रतिष्ठेच्या आधी पालन करावं लागतं. त्यानुसार आजपासून मी…!”

अवघ्या देशभरात सध्या अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेची चर्चा आहे. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवर, आध्यात्मिक व्यक्ती, संत व राजकीय क्षेत्रातील मंडळींना निमंत्रण देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना उद्देशून एक ऑडिओ संदेश जारी केला आहे. आज मोदी नाशिक दौऱ्यावर असून त्या पार्श्वभूमीवर हा संदेश चर्चेचा विषय ठरला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी संदेशामध्ये?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदेशामध्ये राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “जीवनाचे काही क्षण ईश्वराच्या आशीर्वादामुळेच प्रत्यक्षात उतरत असतात. आज जगभरातल्या राम भक्तांसाठी असंच पवित्र वातावरण आहे. सर्वत्र प्रभू श्रीराम यांच्या भक्तीचं अद्भुत वातावरण आहे. चारही दिशांना रामनामाचा जाप ऐकू येतोय. प्रत्येकजण वाट पाहातोय २२ जानेवारीची. आता अयोध्येत प्राणप्रतिष्ठेसाठी फक्त ११ दिवस उरले आहेत. मला या पुण्यप्रसंगाचा साक्षीदार होण्याची संधी मिळत आहे. माझ्यासाठी ही कल्पनेच्या पलीकडची अनुभूती आहे. मी भावुक झालो आहे. पहिल्यांदा आयुष्यात मी अशा प्रकारच्या मानसिक स्थितीतून जात आहे. माझ्यासाठी हा अनुभव एक वेगळीच संधी आहे”, असं मोदी आपल्या संदेशामध्ये म्हणाले आहेत.

हे वाचले का?  दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा

“अनेक पिढ्यांनी वर्षानुवर्षं जे स्वप्न उराशी बाळगलं होतं, मला त्या स्वप्नपूर्तीवेळी उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं आहे. ईश्वराने मला सर्व भारतीयांचं प्रतिनिधित्व करण्याचं निमित्त बनवलं आहे. ही फार मोठी जबाबदारी आहे”, असंही मोदी म्हणाले.

अनुष्ठानाची सुरुवात नाशिकपासून

“आपल्या शास्त्रांमध्येही सांगितलंय की आपल्याला ईश्वराच्या यज्ञासाठी आराधना करण्यासाठी स्वत:मध्येही दैवी चेतना जागृत करावी लागते. शास्त्रांमध्ये व्रत आणि कठोर नियम सांगितले आहेत. या नियमांचं प्राणप्रतिष्ठेच्या आधी पालन करावं लागतं. त्यामुळेच मला आध्यात्मिक व्यक्तींकडून जे मार्गदर्शन मिळालं, त्यांनी जे नियम सांगितले आहेत, त्यानुसार मी आजपासून ११ दिवसांचं विशेष अनुष्ठान सुरू करतोय. या पवित्र क्षणी मी परमात्म्याच्या चरणांशी, जनतेला प्रार्थना करतोय. तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या. जेणेकरून माझ्याकडून कोणतीही कमी राहणार नाही. या ११ दिवसांच्या अनुष्ठानची सुरुवात मी नाशिकधाम पंचवटीपासून सुरू करतोय हे माझं भाग्य आहे. पंचवटीमध्ये प्रभू श्रीराम यांनी बऱ्याच कालावधीसाठी वास्तव्य केलं होतं”, असं मोदींनी यावेळी जाहीर केलं.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान निलगिरी बाग येथील हेलिपॅडपासून दोन किलोमीटरपर्यंत मोदींचा रोड शो होईल. त्यानंतर ते रामघाटावर जलपूजन करतील. जलपूजनानंतर मोदी काळाराम मंदिरात दर्शन घेतील. यानंतर मोदींची एक जाहीर सभाही होणार आहे. यादरम्यान मोदींच्या हस्ते २७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. नाशिकहून मोदी दुपारी नवी मुंबईत दाखल होणार असून तिथे एमटीएचएलचं त्यांच्याहस्ते उद्घाटन होईल. अटल सेतूवरून प्रवास करत मोदी नवी मुंबईतील सभास्थळी जातील. या ठिकाणी मोदींच्या हस्ते विविध प्रकारच्या प्रकल्पांचं लोकार्पण होईल. संध्याकाळी ते पुन्हा दिल्लीला परततील.

हे वाचले का?  नाशिक : लाडकी बहीण मेळाव्यामुळे आज वाहतूक मार्गात बदल