“रामदास कदमांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करत जमीन घोटाळा केला…”; अनिल परब यांचा आरोप, म्हणाले, “किरीट सोमय्यांकडे…”

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर मंत्रिपदाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप केला. तसेच १२ ते १३ घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात आज (२ एप्रिल) अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रामदास कदम मंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत घोटाळा केल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. तसेच रामदास कदम यांनी केलेल्या घोटाळ्याचे सर्व पुरावे आम्ही भाजपा नेते किरीट सोमय्या यांना देणार असून त्यांनी कदम यांच्या ईडी चौकशीची मागणी करावी, असे आव्हान परब यांनी सोमय्या यांना दिले. यावेळी अनिल परब यांनी किरीट सोमय्या हे महाराष्ट्रातील तथाकथित अण्णा हजारे असल्याचा टोला लगावला.

अनिल परब काय म्हणाले?

“रामदास कदम यांनी जमीन घोटाळा केला असून यापुढे त्यांचे १२ ते १३ घोटाळे मी बाहेर काढणार आहे. तसेच कदम यांच्या घोटाळ्याचे पुरावे किरीट सोमय्या यांना देणार आहे. जर किरीट सोमय्या यांची हिंमत असेल तर या जमीन घोटाळ्याचा पाठपुरावा करून रामदास कदम आणि त्यांच्या दोन्ही मुलांना तुरुंगात टाकावे. तसेच या सर्व प्रकरणाची ईडी चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी करावी”, असे आव्हान अनिल परब यांनी दिले.

हे वाचले का?  दरड – पुराचा धोका लक्षात घेता सातारा जिल्ह्यात ७०० लोकांचे स्थलांतर

रामदास कदम यांनी मंत्रिपदाचा गैरफायदा घेतला

“रामदास कदम हे मंत्री होते, तसेच विरोधी पक्षनेते होते. त्यांचा एक भाऊ प्रदूषण महामंडळाचा अध्यक्ष आहे. मात्र, रामदास कदम यांनी आपल्या शासकीय पदाचा गैरफायदा घेत गैरव्यवहार केला. रस्त्यासाठी १५ गुंठे जागा दिली आणि १८ गुंठ्याचे पैसे घेतले. अशा प्रकराचे १२ ते १३ घोटाळे पुढच्या काही काळात मी बाहेर काढणार आहे. रामदास कदम यांनी स्वत:च्या भावालाही सोडलेले नाही. त्यानंतर आमचीही राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही सर्व प्रकरणे मी किरीट सोमय्या यांच्याकडे पाठणार आहे. जर किरीट सोमय्या यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करावा आणि रामदास कदम यांना तुरुंगात पाठवावे”, असे अनिल परब म्हणाले.

हे वाचले का?  Badlapur School Crime Case Live Updates: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!

किरीट सोमय्या यांनी वेळ दिला तर…

“रामदास कदम यांनी केलेल्या घोटाळ्याचे सर्व पुरावे किरीट सोमय्या यांना देणार आहे. तसेच किरीट सोमय्या यांनी वेळ दिला तर हे सर्व प्रकरण नेमके काय आहे? हे समजावून सांगण्यासाठी मी त्यांच्याकडे जाईल”, असा टोला अनिल परब यांनी लगावला.

किरीट सोमय्या महाराष्ट्रातील अण्णा हजारे…

अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर जमिनीच्या घोटाळ्याचा आरोप केला. यानंतर या प्रकरणातील पुरावे आपण किरीट सोमय्या यांच्याकडे देणार असल्याचे सांगितले. मात्र, किरीट सोमय्या यांच्याकडेच का? या प्रश्वावर अनिल परब म्हणाले, “किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र भष्ट्राचारमुक्त करण्याची सुपारी घेतली आहे. ते सतत भष्ट्राचार करणाऱ्या लोकांच्या पाठिशी लागलेले असतात. त्यामुळे आम्ही सोमय्या यांना या प्रकरणाची माहिती देत आहोत. किरीट सोमय्या हे महाराष्ट्रातील अण्णा हजारे आहेत. त्यामुळे त्यांना आमची विनंती आहे”, असे अनिल परब म्हणाले.

हे वाचले का?  फेसबुकवर रिल्स बनवून आमदार होता येत नाही.. शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील यांची टीका