देशातील नागरीकांना पाच लाखांपर्यंतचा आरोग्य विमा केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड असणे बंधनकारक आहे.
अलिबाग- देशातील नागरीकांना पाच लाखांपर्यंतचा आरोग्य विमा केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड असणे बंधनकारक आहे. मात्र योजनेबाबत जागृती नसल्याने लाखो लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. रायगड जिल्ह्यातील ७५ टक्के लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्ड नसल्याची बाब समोर आली आहे.
आयुष्मान भारत योजनेचा पिवळ्या, केशरी आणि पांढऱ्या अशा तिन्ही शिधापत्रिका धारकांना लाभ मिळू शकतो. अगदी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र त्यासाठी प्रत्येकाकडे आयुष्मान कार्ड असणे बंधनकारक आहे. आधार कार्ड आणि रेशन कार्डचे प्रमाणीकरण करून हे कार्ड मोफत काढता येते. अगदी घरबसल्या पोर्टलच्या माध्यमातून हे कार्ड काढता येते. मात्र याबाबतची जाणीव जनसामान्यात फारशी दिसून येत नाही.
रायगड जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत २२ लाख ९० हजार पात्र लाभार्थी आहेत. यापैकी ५ लाख ६२ हजार लाभार्थ्यांकडे आयुषमान भारत कार्ड उपलब्ध आहे. तर उर्वरीत अठरा लाख लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्ड उपलब्ध नाही. त्यामुळे योजनेसाठी पात्र असूनही त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढून घेण्याचे आवाहन आयुष्यमान भारत मिशनचे राज्याचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेट्ये यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाला या कार्डांच्या वितरणासाठी व्यापक मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील तीन महिन्यांत किमान पन्नास टक्के लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्डांचे मोफत वितरण करावे असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
योजनेची सद्यस्थिती –
जुलै ते सप्टेंबर या चार महिन्यांत आयुष्यमान भारत योजनेचा रायगड जिल्ह्यातील ६ हजार १६७ रुग्णांना लाभ मिळाला. त्यांना ६७ कोटी रुपयांपर्यंतच्या आरोग्य चिकित्सा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लोकांना आजारी पडल्यावर लोकांना कार्डाची आठवण येते. मात्र आयत्यावेळी कार्ड मिळण्यासाठी धावपळ करावी लागते त्यामुळे नागरीकांनी आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.