रायगड : सुनील तटकरेंची उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह…

रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांची उमेदवारी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी जाहीर केली. त्यामुळे रायगड जिल्ह्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांची उमेदवारी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी जाहीर केली. त्यामुळे रायगड जिल्ह्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपने रायगडच्या जागेवर दावा सांगितल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. ते आता दूर झाले आहे.

नील तटकरे रायगड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच यासाठी पक्ष आग्रही होता. मात्र भाजपने या जागेवर दावा सांगितला होता. माजी आमदार धैर्यशील पाटील यांना रायगडमधून उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी भाजपच्या जिल्हा कार्यकारीणीने पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षात पक्षात तणाव निर्माण झाला होता. भाजपचे नेते तटकरेंविरोधात कमालीचे आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मध्ये रायगडच्या जागेवरून वाद पेटला असतांनाच, शिवसेनेच्या विकास गोगावले यांना उमेदवारी द्या असे बॅनर समाज माध्यमांवर झळकले होते. त्यामुळे रायगडच्या जागेचा तिढा अधिकच वाढला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सह युतीतील घटक पक्षात संभ्रमाचे वातावरण होते.

हे वाचले का?  “बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!

मात्र अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन सुनील तटकरे हेच महायुतीचे रायगडचे उमेदवार असतील अशी घोषणा केली, आणि रायगडच्या जागेवरून असलेला तिढा सुटल्याचे जाहीर केले. तटकरेंची उमेदवारी जाहीर झाल्याने रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तटकरे यांना खासदार बनवून दिल्लीत पाठवण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.

हे वाचले का?  Rohit Pawar on Narendra Modi: “भटकत्या आत्म्याची भीती अजूनही…”, रोहित पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, “महाराष्ट्रात येणं…”!

रायगडच्या जागेवरून सुरू असलेला वाद आज संपला आहे. येत्या काळात महायुतीचे तिन्ही घटक पक्ष आता एक दिलाने कामाला लागलेले पहायला मिळतील. -मधुकर पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस रायगड

राष्ट्रवादी काँग्रेससाठी आनंदाचा दिवस आहे. गेली अनेक दिवस आम्ही या घोषणेची वाट पाहत होतो. आज ती झाली. रायगड लोकसभा मतदारसंघातून तटकरे साहेबांना पुन्हा एकदा दिल्ली पाठवण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करू. -अमित नाईक, संघटक, अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ

हे वाचले का?  Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान