शहरातील महात्मा गांधी रस्ता, मेन रोड, रविवार कारंजा, अशोक स्तंभ, बोहोरपट्टी कॉर्नर या मध्यवर्ती भागात वारंवार वाहतूक कोंडी होत असते.
नाशिक : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडीची कारणे वेगळी असली तरी शहरातील मध्यवर्ती भागात वारंवार होणाऱ्या कोंडीस रिक्षांचा बेशिस्तपणा कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या दुचाकींविरोधात कारवाई केली जात असताना रिक्षांकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने दुचाकीधारकांसह मध्यवर्ती भागातील व्यापारीवर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील महात्मा गांधी रस्ता, मेन रोड, रविवार कारंजा, अशोक स्तंभ, बोहोरपट्टी कॉर्नर या मध्यवर्ती भागात वारंवार वाहतूक कोंडी होत असते. या भागात दुकाने, व्यापारी आस्थापना, वेगवेगळय़ा कार्यालयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या भागात कायमच वर्दळ असते. रस्त्यांवर बेशिस्तपणे उभ्या केल्या जाणाऱ्या दुचाकी प्रशासनाच्या वतीने उचलून नेल्या जातात. रविवार कारंजा ते बोहोरपट्टी कॉर्नर या भागात रस्त्यावर कुठेही रिक्षा उभ्या असलेल्या दिसतात. त्यामुळे इतर वाहनांना जाण्यासाठी रस्ताच राहत नसल्याने प्रसंगी वादावादीही होते. विशेष म्हणजे एखाद्या रिक्षास धक्का लागल्यास सर्वच रिक्षाचालक धावून जातात. रस्त्यात बेशिस्तपणे उभ्या केल्या जाणाऱ्या रिक्षांमुळे वाहतुकीस अडथळा होत असतानाही वाहतूक पोलिसांकडून त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांकडून पाहणीवेळी मात्र या रिक्षा शिस्तीत उभ्या राहतात. बेशिस्त दुचाकीधारकांप्रमाणेच बेशिस्त रिक्षांविरुद्धही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.