रुद्धिपुरात मराठी भाषा विद्यापीठासाठी सकारात्मक ; महानुभाव संमेलनात देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मोहनदास महाराज यांनी मराठी भाषा विद्यापीठासाठी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावले उचलली होती.

नाशिक : महाराष्ट्री असावे असे वचन सांगणाऱ्या श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या रुद्धिपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ तयार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

येथील डोंगरे वसतिगृह मैदानात सुरू असलेल्या भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव आणि अखिल भारतीय महानुभाव संमेलनात फडणवीस यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. चक्रधर स्वामी यांनी मराठी भाषेची अस्मिता जपली. लीळाचरित्रच्या माध्यमातून मराठी भाषेचा पहिला आद्यग्रंथ रचला गेला. रुद्धिपूर येथे ही ग्रंथनिर्मिती झाल्याने त्याच ठिकाणी मराठी भाषेचे विद्यापीठ होईल, असे फडणवीस यांनी सांगितले. मंत्री गिरीश महाजन यांनी महानुभाव पंथ सर्वाना सामावून घेणारा असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शासनाच्या माध्यमातून लीळाचरित्र ग्रंथाची छपाई व्हावी, त्याची माफक दरात शासनाने विक्री करावी, अशी मागणी केली.  मोहनदास महाराज यांनी मराठी भाषा विद्यापीठासाठी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावले उचलली होती. परंतु, मागील सरकारने कोणतेच प्रयत्न केले नसल्याचे सांगितले. रुद्धिपूर येथे नदीपात्रात बांधकाम केले जात नसल्याचे सांगितले जात आहे. असे असताना पंचवटी नदीपात्रात कामे कशी होतात, असा प्रश्न मोहनदास महाराज यांनी उपस्थित केला. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर बाळासाहेब सानप, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सप्तग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

हे वाचले का?  Nashik Crime : नाशिकमध्ये दुचाकीवर बसलेल्या तरुणाची हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद

फडणवीस, महाजन, खडसे एकाच व्यासपीठावर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहेत. संमेलनात तिघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित राहण्याचा योग आला. प्रारंभी खडसे यांनी फडणवीस, महाजन यांच्याकडे तसेच दोघांनीही खडसे यांच्याकडे पाहणे टाळले. खडसे यांचे भाषण झाल्यानंतर महाजन आणि फडणवीस यांच्याशी काही सेकंद संभाषण करून ते पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसले.

हे वाचले का?  नाशिक : माजी नगरसेविकेच्या घरी चोरी, एक कोटीहून अधिक रकमेचे दागिने लंपास

पावसामुळे संमेलनस्थळी गोंधळ

मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संमेलनात कार्यक्रम सुरू असताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. मुख्य सभा मंडपा लगत असलेला मंडप ठिकठिकाणी गळू लागला. सभा मंडपात पाणी आल्याने काहींनी खुर्चीवर उभे राहून कार्यक्रम पाहणे पसंत केले. गोंधळ वाढल्याने व्यासपीठावरील वक्त्यांनीही भाषणे आटोपती घेतली. स्वयंपाकासाठी तयार करण्यात आलेल्या मंडपातही दाणादाण उडाली.

हे वाचले का?  देवळालीत तोफगोळ्याचा स्फोट, लष्कराकडून चौकशीचे आदेश