लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; लेफ्टनंट कर्नल शहीद

२०१५ साली भारताने रशियासोबत कामोव्ह २२६ हेलिकॉप्टरच्या संयुक्त उत्पादनासाठी करार केला होता.

तवांग (अरुणाचल प्रदेश) : येथे भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत लष्कराच्या हवाई विभागातील लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव शहीद झाले. मेजर दर्जाचा त्यांचा सहकारी वैमानिक जखमी झाला आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी १०च्या सुमारास सीमा भागात नियमित उड्डाणादरम्यान हा अपघात झाल्याचे तेजपूर येथील संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?

दुर्घटनेनंतर दोन्ही वैमानिकांना तातडीने जवळच्या लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र लेफ्टनंट कर्नल यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी दोन तारांकित अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र या अपघातामुळे कालबाह्य होत असलेल्या चित्ता आणि चेतक या हेलिकॉप्टरच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. २०१५ साली भारताने रशियासोबत कामोव्ह २२६ हेलिकॉप्टरच्या संयुक्त उत्पादनासाठी करार केला होता.