केंद्रांवरील गर्दीत संक्रमण रोखण्यासाठी प्रतिजन चाचण्या
केंद्रांवरील गर्दीत संक्रमण रोखण्यासाठी प्रतिजन चाचण्या
नाशिक : लसीकरणाआधी करोना चाचणी करून त्यातील सकारात्मक रुग्ण शोधणे आणि नकारात्मक व्यक्तींचे लसीकरण या उपक्रमांतर्गत इंदिरा गांधी रुग्णालय, मायको दवाखाना, म्हसरूळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरणास आलेल्या ४१३ नागरिकांची प्रतिजन चाचणी करण्यात आली. त्यात १० व्यक्ती करोनाबाधित आढळल्या. नकारात्मक अहवाल आलेल्या उर्वरित ४०३ जणांचे लसीकरण करण्यात आले.
महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी आणि नाशिक वॉरियर्स यांच्यावतीने गुरूवारपासून शून्य मोहीम आणि लसीकरण या उपक्रमास इंदिरा गांधी रुग्णालयात महापौर सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. या माध्यमातून नागरिकांची मोठय़ा प्रमाणात चाचणी केली जाईल. बाधितांना वेळेवर उपचार उपलब्ध होतील तसेच गर्दीत संक्रमण थांबविण्याचा प्रयत्न आहे. इंदिरा गांधी रुग्णालयासह फुलेनगर येथील मायको दवाखाना आणि म्हसरूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हे अभियान सुरू झाले. पहिल्याच दिवशी एकूण ४१३ प्रतिजन चाचण्या करून १० बाधित रुग्णांना शोधण्यात यश आले.
४०३ व्यक्तींचे अहवाल नकारात्मक आले. त्यांचे लसीकरण करण्यात आले. पुढील काळात सहा विभागातील सर्व लसीकरण केंद्रांजवळ ही मोहीम राबविली जाणार आहे. या ठिकाणी लसीकरणा व्यतिरिक्त नागरिक येऊन प्रतिजन चाचणी करून घेऊ शकतात.
करोनाच्या पहिल्या लाटेत भारतीय जैन संघटना आणि इतर स्वयंसेवी संस्था यांच्या पुढाकाराने ७५ हजार १६६ नागरिकांच्या प्रतिजन चाचण्या करून १२ हजार ५९५ रुग्णांना शोधण्यात आले होते. स्मार्ट हेल्मेटद्वारे एक लाखहून अधिक नागरिकांचे तापमापन करण्यात आले. त्यात १४७२ संशयित रुग्ण शोधले गेले. या उपक्रमाची करोनाचे संक्रमण रोखण्यात मदत झाली. दुसऱ्या लाटेत प्राणवायू बँक कार्यरत करण्यात आली. पालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार शून्याधारीत मोहीम आणि लसीकरण हे अभियान सुरू करण्यात आल्याची माहिती मोहिमेचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला यांनी दिली.