लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमात ५० हजार लाडक्या बहिणींना सहभागी करण्यासाठी तब्बल ९०० बसेसचा वापर करण्यात येणार आहे.

नाशिक : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत येथे होणाऱ्या कार्यक्रमात ५० हजार लाडक्या बहिणींना सहभागी करण्यासाठी तब्बल ९०० बसेसचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे नाशिकसह धुळे, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांतून बसेस मागविल्या जाणार आहेत. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील प्रवासी, पासधारक विद्यार्थ्यांची दैनंदिन वाहतूक कोलमडण्याची शक्यता आहे.

पंचवटीतील तपोवन मैदानात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होत आहे. भव्य जलरोधक तंबू उभारण्यात येत आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून ५० हजार लाडक्या बहिणींना निमंत्रित करण्यात आले आहे. तालुकानिहाय बहिणींच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहनच्या ७०० आणि शहरातील बहिणींसाठी नाशिक परिवहन महामंडळाच्या (सिटीलिंक) २०० अशा एकूण ९०० बस सज्ज ठेवल्या जातील.

हे वाचले का?  Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दोघांना उमेदवारी जाहीर; शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, तर पंढरपूरमधून…

राज्य परिवहन नाशिकमधून २५० आणि शेजारील अहमदनगर, धुळे, जळगाव जिल्ह्यातून उर्वरित ४५० बसेस मागविण्यात येत आहेत. नाशिक मनपा परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंक आपल्या ताफ्यातील ८० टक्के बस उपलब्ध करत आहेत. यामुळे शुक्रवारी नाशिक शहरासह ग्रामीण भागातील बससेवा विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. कमी-अधिक प्रमाणात धुळे, जळगाव अहमदनगरमध्येही बसेसची कमतरता जाणवणार आहे. लाडक्या बहीण कार्यक्रमाची झळ जिल्हांतर्गत आणि लांब पल्ल्याच्या बससेवेला बसणार असल्याचे चित्र आहे.

हे वाचले का?  Jayakwadi Dam: जायकवाडीसाठी नाशिकमधून आतापर्यंत १७ टीएमसी पाणी, धरणांतील विसर्ग मंदावला

सिटीलिंकचे एक लाख प्रवासी

मनपा सिटीलिंक बस सेवेतून दररोज एक लाख जण प्रवास करतात. यामध्ये २६ हजार पासधारक विद्यार्थी आहेत. २५० पैकी २०० बसेस लाडक्या बहीण कार्यक्रमासाठी वापरल्या जातील. कार्यक्रम संपल्यानंतर बहिणींना पुन्हा घरी सोडले जाणार असल्याने त्या बस लगेचच प्रवासी सेवेत वापरता येणार नाहीत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले. यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

काही मार्गांवर फेऱ्या कमी करणार

नाशिक, धुळे, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातून ७०० बसेस कार्यक्रमासाठी उपलब्ध करताना प्रवाशांना त्रास होणार नाही, अशा प्रकारे नियोजन केले जात आहे. प्रत्येक आगारात काही बस अतिरिक्त असतात. काही मार्गावर फेऱ्या कमी करून कार्यक्रमासाठी बस उपलब्ध केल्या जातील. -अरूण सिया (विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ)