लेव्हीविषयी तोडगा न निघाल्यास मतदानावर बहिष्कार, माथाडी कामगारांचा इशारा

लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर माथाडी मंडळाचे सुमारे पाच हजार कामगार व त्यांचे कुटुंबिय बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीत असल्याकडे महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटनेने लक्ष वेधले आहे.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समितीत कृषी मालाच्या लिलावात हमाली, तोलाई व वाराईची प्रचलित पद्धतीने कपात होण्यासाठी शासकीय यंत्रणांनी कामगार दिनापर्यंत कार्यवाही न केल्यास लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर माथाडी मंडळाचे सुमारे पाच हजार कामगार व त्यांचे कुटुंबिय बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीत असल्याकडे महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटनेने लक्ष वेधले आहे.

हमाली, तोलाई आणि वाराईच्या मुद्यावरून हमाल व माथाडी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. त्यामुळे बाजार समित्यांच्या आवारात व्यापारी, आडते, खरेदीदार शेतकरी, बाजार समितीचे अधिकारी, माथाडी व मापारी कामगारांनी पुर्वप्रचलित पद्धतीने कामकाज करावे, बाजार समित्यांमधील ठप्प व्यवहार सुरळीतपणे करावेत, आचारसंहिता संपल्यानंतर राज्य सरकारकडे सर्व संबंधित घटकांच्या प्रश्नासंबंधीचे म्हणणे मांडून धोरणात्मक निर्णय घेण्यास सहकार्य केले जाईल, अशा सूचना काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या होत्या.

हे वाचले का?  नववर्षात नाशिकमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना गणवेश; महिन्यातून एकदा सार्वजनिक वाहतूक वापराचे बंधन

जिल्हा उपनिबंधकांनी अनेक वेळा संयुक्त बैठका घेऊन संबंधितांना सूचना केल्या. या बैठकीस व्यापारी, आडते, खरेदीदार, शेतकरी प्रतिनिधी, बाजार समितीचे पदाधिकारी, माथाडी मंडळाचे अधिकारी, माथाडी कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु, माथाडी व मापारी कामगारांच्या हमाली व तोलाईची मजुरी कपात करण्यास विरोध करुन या घटकाला बेरोजगार करण्याचे धोरण अवलंबिले जात असल्याच्या निषेधार्थ माथाडी, मापारी कामगार आंदोलन करण्याच्या विचारात आहे. तसेच जिल्ह्यातील लोकसभेच्या मतदानावर माथाडी मंडळाचे सुमारे पाच हजार नोंदीत माथाडी कामगार व त्यांचे कुटुंबिय बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीत असून, कामगार दिनापर्यंत न्याय मिळण्याची अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली आहे.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक जलसाठा, आरक्षणासाठी पालकमंत्र्यांची प्रतीक्षा

या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही व अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, परंतु, माथाडी व मापारी कामगारांच्या हमाली-तोलाईवरून बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प झाल्याचा गैरसमज संबंधितांकडून पसरविला जात आहे, यास माथाडी व मापारी कामगारांनी आक्षेप घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अंमलबजावणी करण्यास या घटकांने आधीच संमती दिली आहे. जे घटक विरोधी भूमिका घेत आहेत, तेच या बाबीस कारणीभूत असल्याची तक्रार माथाडी संघटनेने केली. हमाली व तोलाईची मजुरी व्यापारी व आडत्यांनी पूर्वप्रथेनुसार शेतकऱ्यांच्या हिशेब पट्टीतून कापून देण्यास विरोध दर्शविल्याने बाजार आवारातील व्यवहार ठप्प आहेत. शेतकरी व माथाडी कामगारांचे नुकसान होऊ नये म्हणून व्यापारी व आडत्यांनी प्रचलित पध्दतीची अमलबजावणी करावी, अशी मागणी माथाडी व मापारी कामगारांनी केली आहे.

हे वाचले का?  समीर भुजबळ यांचे राष्ट्रवादीत पुनर्वसनाचे संकेत