लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र?; शरद पवारांचं मोठं विधान

महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असं कोणाला पटलं नसतं असं म्हटलं आहे. आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं असून पुढील पाच वर्ष हे सरकार टीकेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

“आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं. शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असं कोणला पटलं नसतं. पण आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावलं टाकली आणि आज हे आघाडी सरकार चांगल्या रितीने काम करत आहे,” असं कौतुक शरद पवारांनी यावेळी केलं. सरकार झाल्यानंतर किती दिवस टिकणार अशी चर्चा सुरु होती अशी आठवण करुन देताना हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष टीकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्र बसले आणि चर्चा केली असं सांगत लगेच वेगवेगळ्या शंका घेण्यात आल्या असं सांगत शरद पवारांनी यावेळी टीकाकारांना उत्तर दिलं. “शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचं राज्य आलं त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना. नुसते पुढे आले नाहीत तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो तुम्ही विचार करा. पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने ज्या पद्दतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसं होणार नाही,” असं शरद पवार म्हणाले आहेत.

हे वाचले का?  Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार

“हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतंच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम करेल याबाबत शंका नाही,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

“देशात अनेकांनी अनेक पक्ष काढले. १९७७ मध्ये जनता पार्टीचा प्रयोग झाला पण दोन वर्षात तो प्रयोग संपला. असे अनेक पक्ष आले.. पण राष्ट्रवादीनं २२ वर्ष पूर्ण केली. सहकाऱ्यांच्या कष्टानं, जनतेच्या बांधिलकीमुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहेत. जनतेचा विश्वास संपादन करण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. कधी आपण सत्तेत होतो तर कधी नव्हतो, पण त्याचा त्याचा फारसा काही परिणाम होत नाही,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

राजेश टोपेंचं कौतुक

“काही लोक गेले पण त्यामुळे नवीन लोक, नवीन नेतृत्व तयार झालं. मंत्रीमंळातील अनेक जण नवी जबाबादारी पार पडण्यात यशस्वी होत आहेत. एरव्ही हे लोकांसमोर आलं नसतं. देशात एवढं मोठं संकट आलं असताना महाराष्ट्रात गंभीर स्थिती होती. संकटाचा सामना करण्यासाठी आणि लोकांना दिलासा, विश्वास देण्यासाठी राजेश टोपेंच्या नेतृत्वात आरोग्य खात्याने काम केलं आणि त्याचा परिणाम या सगळ्या संकटातून बाहेर पडू शकतो असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. राजेंद्र शिंगणे, टोपे अशा प्रत्येकाने आपली जबाबदारी उत्तमपणे पार पडली. महाराष्ट्राला नेतृत्वाची फळी देऊन विश्वास देण्याचं काम राष्ट्रवादीने केलं. राजकारणात नव्या पिढीला प्रोत्साहन आणि संधी दिली पाहिजे. उत्तम काम करत असेल तर पाठीशी उभं राहिलं पाहिजे,” असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

हे वाचले का?  फेसबुकवर रिल्स बनवून आमदार होता येत नाही.. शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील यांची टीका

“लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी सत्ता महत्वाची आहे. पण त्यामुळे नेतृत्वाची फळी निर्माण होते हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. याचं १०० टक्के श्रेय पाठीशी उभ्या राहणाऱ्या सामान्यांचं असून त्यांची बांधीलकी कायम ठेवली पाहिजे,” असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

शिवभोजन थाळीसंंबधी माझ्या मनातही शंका होती

“करोना संकटातून बाहेर पडताना अनेक उपक्रम राबण्यात आले. शिवभोजन थाळीसारखा एक उपक्रम हाती घेतला. तो उपक्रम राबवण्यासंबंधी चर्चा झाली तेव्हा माझ्याही मनात शंका होती. पण ते काम अतिशय उत्तम प्रकारे सुरु आहे,” असं शऱद पवार यांनी सांगितलं. “संकटात आपण थांबलो नाही. तर करोनाला सामोरं गेलो. शिवभोजन थाळीसारखे कार्यक्रम राबवले. मोफत धान्य शेवट्या लोकांपर्यंत जातील याची काळजी घेतली,” असं सांगत शरद पवारांनी आपल्याला राष्ट्रवादीच्या भवितव्याची चिंता नसल्याचं म्हटलं आहे.

सत्ता एकाच ठिकाणी राहिली की भ्रष्ट होते

“मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. सत्ता अधिक हातात गेली पाहिजे. सत्ता एकाच ठिकाणी राहिली की भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे आणि हे मान्य असेल तर समाजातील प्रत्येत घटकाला आपण सत्तेचे वाटेकरी आहोत असं वाटलं पाहिजे,” असं शरद पवारांना सांगितलं.

हे वाचले का?  Maharashtra News Live : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, भेटीचं कारण काय? राजकीय चर्चांना उधाण

“मी राज्याचा मुख्यमंत्री असताना ग्रामपंचायत, गावचे पोलीस पाटील यामध्येही ओबीसी आणि इतरांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील एका गावात गेलो असता चहासाठी एका घरी गेलो होते. तिथे जुने काही कार्यकर्ते होते. त्यांनी मला साहेब हे काम काही चांगलं केलं नाही म्हटलं. आमच्या गावची पाटीलकी गेल्यावर कसं व्हायचं असं ते म्हणाले. यावर नुकसान काय असं विचारलं असता ते उत्तर देऊ शकले नाही. पुन्हा पाच ते सात वर्षांनी भेट झाली असता गाव आता पूर्वीपेक्षा आता एकत्रित आहे असं सांगितलं. याचं कारण पिढ्यानपिढ्या सत्ता आमच्या घरात ठेवली होती. सत्ता अधिक लोकांच्या हाती गेली हे लोकांना आवडलं असल्याचं त्यांनी सांगितलं,” अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.