लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतातले रस्ते अमेरिकेतल्या रस्त्यांच्या तोडीचे होणार? वाचा गडकरी काय म्हणाले…

वाहूतककोंडी कमी करण्यासाठी टोल प्लाझांना पर्यायी नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील रस्ते बांधणीसंदर्भात एक मोठे लक्ष्य निर्धारित केले आहे. सरकार २०२४ पर्यंत देशात २६ हरित द्रुतगती महामार्ग (Green Express Highway) बांधणार असल्याची माहिती गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत बोलताना दिली. या महामार्गांमुळे देशातील महत्त्वाच्या शहरांमधील प्रवासाचा कालावधी कमी होणार असल्याचेही ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतातले रस्ते अमेरिकेतील रस्त्यांच्या तोडीचे असतील, असे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले.

हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते देहरादून, हरिद्वार आणि जयपूरचे अंतर दोन तासांनी कमी होणार आहे. याशिवाय दिल्ली ते चंदिगढ केवळ अडीच तासांमध्ये, दिल्ली ते अमृतसह चार तासांमध्ये तर दिल्ली आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये अवघ्या १२ तासांमध्ये पोहोचता येणार आहे. या ठिकाणांवरील वाहूतककोंडी कमी करण्यासाठी टोल प्लाझांना पर्यायी नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून संशोधन सुरू असल्याची माहिती गडकरींनी राज्यसभेत दिली. टोल गोळा करण्यासाठी मंत्रालयाकडून दोन पर्यायांवर सध्या विचार सुरू आहे. सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करून गाडीतील जीपीएसद्वारे गाडीमालकाच्या बँक खात्यातून थेट रक्कम वजा होईल, या पर्यायाबाबत विचार सुरू असल्याचे गडकरी म्हणाले. या यंत्रणेद्वारे वाहनाचा टोल क्षेत्रामध्ये प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या ठिकाणांची नोंद केली जाईल. महामार्गावर गाडीने किती किलोमीटर प्रवास केला, याप्रमाणे टोलवसूली केली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले. ही यंत्रणा महिन्याभरात लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी मंत्रालयाकडून प्रयत्न केले जात आहेत.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?

गाडीच्या नंबरप्लेटवरून टोल गोळा करण्यासाठी नवी यंत्रणा तयार करता येईल का? यावरही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ‘२०१९ पासून नव्या तंत्रज्ञानासह नवी नंबरप्लेट तयार करण्यात आली आहे. संगणकीकृत प्रणालीद्वारे एका सॉफ्टवेअरच्या मदतीने टोल गोळा करता येऊ शकतो’, हा अन्य पर्याय असल्याचे गडकरी म्हणाले. दरम्यान, आत्तापर्यंत पाच कोटी ५६ लाख फास्टॅग वितरीत करण्यात आले आहेत. या माध्यमातून दररोज १२० कोटींची टोलवसूली केली जात असल्याची माहिती गडकरींनी दिली.

हे वाचले का?  Fraud Supreme Court : बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश अन् खोटा निकाल… सायबर ठगांचा व्यावसायिकाला सात कोटींचा गंडा