वरिष्ठ निवड श्रेणीतील आभासी प्रशिक्षणाचा फज्जा; प्रशिक्षणार्थी शिक्षकांना अनेक अडचणी

राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, अध्यापक, प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी (१२ वर्ष सेवा) आणि निवड श्रेणी (२४ वर्ष सेवा) अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत जूनपासून आभासी प्रणालीन्वये प्रशिक्षण सुरू झाले आहे.

नाशिक : राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, अध्यापक, प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी (१२ वर्ष सेवा) आणि निवड श्रेणी (२४ वर्ष सेवा) अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत जूनपासून आभासी प्रणालीन्वये प्रशिक्षण सुरू झाले आहे. परंतु, या प्रशिक्षणाचा पहिल्या दोन दिवसातच फज्जा उडाला असून शिक्षक प्रशिक्षणार्थीना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्रशिक्षणार्थीना लॉगिन, पासवर्डची समस्या येत आहे.
राज्यातील एकूण ९४,५४१ नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी एकाच वेळी हे प्रशिक्षण आभासी प्रणालीन्वये आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. आभासी प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत विकसित प्रशिक्षण पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण करता येणार आहे. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी चार गट करण्यात आले आहेत. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय असे चार गट ठरविण्यात आले आहेत.
आभासी प्रशिक्षण हे ५० ते ६० तासांचे असून प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थ्यांस त्याच आभासी प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.
हे आभासी प्रशिक्षण सुरु होऊन दोन दिवसही होत नाही तोच त्याचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. प्रशिक्षणार्थीना लॉगिन, पासवर्डची अडचण येत आहे. लॉगिन करताना ‘इंटर्नल सव्‍‌र्हर एरर’ हा संदेश येत असल्याने लॉगिनसाठी अनेक वेळा प्रयत्न करावे लागत आहेत.
त्यातच बहुतांशी प्रशिक्षणार्थी शिक्षक हे प्रशिक्षण भ्रमणध्वनीवर करत असल्याने मध्येच कोणाचा फोन आल्यास प्रशिक्षणात खंड पडून पुन्हा लॉगिन करताना एरर येत असून त्यात वेळ जात आहे.
संपूर्ण उन्हाळी सुट्टी संपत आल्यावर ऐन शाळा सुरू होण्याच्या वेळी प्रशिक्षण सुरू झाले असून ‘सव्‍‌र्हर समस्या’मुळे वेळेत प्रशिक्षण पूर्ण होण्यास अडथळा येत आहे. तसेच भ्रमणध्वनी संपर्क समस्या ग्रामीण भागात अधिक आहे. विद्युत पुरवठा गेल्यास संपर्कही गायब होत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांना शाळेचेही कामे करावी लागणार आहेत. त्यातच पावसाळा सुरू झाल्यावर संपर्क समस्या येतेच. त्यामुळे आभासी प्रशिक्षण कसे पूर्ण होणार, मे महिन्यात सुट्टी असतांना शालेय शिक्षण विभागाने प्रशिक्षण का घेतले नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रत्यक्ष उपस्थितीत प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे समविचारी शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. यासाठी सर्व शिक्षक संघटना आणि प्रशिक्षणार्थी एकत्र येऊन आंदोलन करतील, असा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आर. डी. निकम यांनी दिला आहे.
आधीच हे प्रशिक्षण विलंबाने सुरु होत आहे. संपूर्ण मे महिन्यात अपेक्षित असलेले प्रशिक्षण शाळा उघडण्याच्या तोंडावर सुरू होत असून त्यात ऑनलाइन एरर अडचणींमुळे प्रशिक्षणार्थी वैतागले असून शिक्षक संघटनांकडे प्रत्यक्ष उपस्थितीत प्रशिक्षण घेण्याविषयी मागणी करत आहेत. एक-दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास निवेदन देण्यात येईल.-नीलेश ठाकूर (राज्य, समन्वयक)

हे वाचले का?  लाच स्वीकारताना वेतन भविष्य निर्वाह निधी पथकची महिला अधिकारी जाळ्यात