“वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” मनसेचं पोलिसांना जाहीर आव्हान

“ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलंत त्याच हातांनी सलाम करायला लागेल हे पण लक्षात ठेवा”

वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, महाराष्ट्र सैनिक काय आहेत हे दाखवून देऊ असं आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलं आहे. वसईमध्ये पोलिसांनी कारवाई करताना मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याने संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे. संदीप देशपांडे यांनी व्हिडीओ शेअर करत थेट पोलिसांनाच आव्हान दिलं आहे. यावेळी त्यांनी मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसंच सरकारचे दलाल असल्यासारखे वागू नका सांगताना आझाद मैदानात काढलेल्या मोर्चाची आठवण करुन दिली.

संदीप देशपांडे यांनी काय म्हटलं आहे –
“आमचे महाराष्ट्र सैनिक आंदोलन करत असताना हात उचलणारे पोलीस आम्ही पाहिले. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांना आई-बहिणीवरुन शिव्या देत होते. सरकारचे दलाल असल्यासारखं पोलिसांनी वागू नये. सत्ता येते आणि सत्ता जाते…पोलिसांनी पोलिसांसारखं काम केलं पाहिजे. तुम्ही कानाखाली मारलीत त्याचीही गरज नव्हती. एवढा माज दाखवू नका. पोलिसांनी सत्तेची दलाली करु नये. एवढीच जर हिंमत असेल तर दोन तास तुमची वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी भिडा….मग आम्ही दाखवतो राज ठाकरेंचे कट्टर मनसैनिक काय आहेत ते…जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा तुमच्या संरक्षणासाठी आझाद मैदानावर आम्ही सर्वांनी मोर्चा काढला. पोलिसांवर हात उचलायचा नाही ही राज ठाकरेंची शिकवण आहे म्हणून ही गोष्ट सहन करतोय. ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारलंत त्याच हातांनी सलाम करायला लागेल हे पण लक्षात ठेवा,” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  Social Media Ban for Kids : “लहान मुलांचं बालपण जपण्यासाठी!”, सोशल मीडियावर वयाचं बंधन येणार, ‘हा’ देश कायदा बनवण्याच्या तयारीत!

काय झालं होतं –
परिवहन सेवेच्या उद्घाटनासाठी वसईत आलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मनसे कार्यकर्त्यांकडून “आयुक्त साहेब वेळ द्या” अशी घोषणा देण्यात आली. यावेळी पोलीस अधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढताना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

हे वाचले का?  सांगलीत महापालिका शाळेत तब्बल ४० विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षिका निलंबित

कार्यक्रमात मनसे कार्यकर्ते गोंधळ घालणार असल्याची पोलिसांना कुणकूण लागली होती. त्यामुळे पोलिसांनी जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह ३५ कार्यकर्त्यांना आधीत ताब्यात घेतलं होतं. तरी पोलिसांची नजर चुकवून दोन कार्यकर्ते कार्यक्रमात शिरले आणि त्यांनी घोषणाबाजी केली.