वर्षभर नाशिककरांची जलचिंतेतून सुटका ; धरणसाठा ९३ टक्क्यांवर; नांदूरमध्यमेश्वरमधून ६४ टीएमसी पाणी जायकवाडीकडे

यंदाच्या हंगामात आतापर्यंत नांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडीकडे तब्बल ६४ टीएमसी पाणी प्रवाहित झाले आहे.

नाशिक : महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ऑगस्टच्या उत्तरार्धात जिल्ह्यातील लहान-मोठय़ा २४ धरणांमधील जलसाठा ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तुडुंब भरलेल्या आणि भरण्याच्या स्थितीत असणाऱ्या १९ धरणांमधून विसर्ग करावा लागत आहे. इतक्या वेगाने धरणे तुडुंब भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. पावसाळय़ात प्रदीर्घ काळ कोरडेठाक राहण्याचा इतिहास असलेल्या नागासाक्यामध्येही यंदा ४२ टक्के जलसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या जलसाठय़ाचा विचार करता यंदा ३७ टक्के अधिक जलसाठा आहे. मराठवाडय़ातील जायकवाडी धरण १०२ टीएमसी क्षमतेचे आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत नांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडीकडे तब्बल ६४ टीएमसी पाणी प्रवाहित झाले आहे.

जूनमध्ये प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने जुलैत संपूर्ण कसर भरून काढली. तेव्हापासून आतापर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळत आहे. यामुळे वर्षभरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. महिनाभरात इतका पाऊस झाला की, बहुतांश धरणे तुडुंब होऊन त्यातून अतिरिक्त पाणी सोडावे लागत आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या ५३८६ दशलक्ष घनफूट (९६ टक्के) जलसाठा झाला आहे. याच धरण समूहातील काश्यपीत (९९), गौतमी गोदावरी (९९), आळंदी (१००) असा जलसाठा आहे. पालखेड (६८), करंजवण (८२), पुणेगाव (९०), दारणा (९७), मुकणे (९८), कडवा (८९), नांदूरमध्यमेश्वर (९६), चणकापूर (७६), गिरणा (९०), पुनद (८२) आणि माणिकपुंज धरणात (७१) टक्के जलसाठा आहे. वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे कधीच तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत. पांझण नदीवरील नागासाक्या हे ३३५ दशलक्ष घनफूट क्षमतेचे लहान धरण पावसाळय़ातही लवकर भरत नसल्याचा इतिहास आहे. अनेकदा ते कोरडे राहते. यंदा मात्र त्या धरणात १६५ दशलक्ष घनफूट (४२ टक्के) जलसाठा झाला आहे. जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये सध्या ६० हजार ८३८ दशलक्ष घनफूट (९३ टक्के) जलसाठा आहे. गतवर्षी हेच प्रमाण ५६ टक्के होते.

हे वाचले का?  द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या महिलेस दिल्लीत अटक

१९ धरणांमधून विसर्ग

संततधारेने तुडुंब भरलेल्या आणि भरण्याच्या स्थितीत असलेल्या धरणांमधून अनेक दिवसांपासून पाणी सोडावे लागत आहे. गुरुवारी गंगापूरमधून (२८१४), आळंदी (८०), पालखेड (५५७२), करंजवण (४२३९), वाघाड (१२३९), ओझरखेड (११२०), पुणेगाव (२८२), तिसगाव (२६०), दारणा (५७५०), भावली (५८८), मुकणे (१५००), वालदेवी (१८३), कडवा (२२५०), नांदूरमध्यमेश्वर (३७५५८), भोजापूर (१९०), चणकापूर (२११९), हरणबारी (१२२२), केळझर (३८८) आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा गिरणा धरणातून (९५०४) क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून यंदाच्या हंगामात आतापर्यंत ६४ हजार ३५९ दशलक्ष घनफूट म्हणजे तब्बल ६४ टीएमसीहून अधिक पाणी मराठवाडय़ाकडे प्रवाहित झाले आहे.

हे वाचले का?  नाशिकात ATS ची कारवाई, दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत

शहरात उद्या पाणीपुरवठा बंद

गंगापूर आणि मुकणे धरणातील वीज उपकेंद्र आणि पंपिंग स्टेशन येथील दुरुस्ती कामामुळे शहरात शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मुकणे धरण पंपिंग स्टेशनला ज्या द्रुतगती फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. त्याचा वीजपुरवठा दुरुस्ती कामामुळे शनिवारी दिवसभर बंद ठेवला जाणार आहे. मनपाच्या गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील दुरुस्तीची कामे याच दिवशी करण्यात येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही धरणांतील पंपिंग स्टेशनवरून मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे शनिवारी संपूर्ण शहरात सकाळी आणि सायंकाळी पाणीपुरवठा होणार नसल्याचे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.

हे वाचले का?  भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन