वर्षभरात नाशिकरोड परिसरास शुद्ध पाणी

नाशिक रोड विभागातील नागरिकांना पिण्याचे पाणी हे दारणा नदीतील चेहेडी पंपिंग केंद्रातून घेऊन शुद्धीकरण करून पिण्यासाठी पुरविले जात आहे.

जलवाहिनीसाठी १९ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता

नाशिक : वालदेवी नदीतील साचलेल्या पाण्यात अळ्या तयार होऊन ते पाणी नाशिकरोडच्या भागात येत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ९०० मीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी १९ कोटींच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. या कामासाठी जलदाय व्यवस्था प्रकल्पअंतर्गत पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित खर्च पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकातून केला जाईल. यामुळे आगामी वर्षात नाशिकरोडकरांना शुद्ध पाणी मिळणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

नाशिक रोड विभागातील नागरिकांना पिण्याचे पाणी हे दारणा नदीतील चेहेडी पंपिंग केंद्रातून घेऊन शुद्धीकरण करून पिण्यासाठी पुरविले जात आहे. चेहेडी पंपिंग केंद्र  हे दारणा, वालदेवी नदीच्या संगमाजवळ असल्याने वालदेवी नदीला आवर्तन सुटल्यानंतर पंपिंगद्वारे उचलून शुद्धीकरण करून दिले जाते, परंतु वालदेवीमधील साचलेल्या पाण्यात अळ्या तयार होऊन पाणी उचलण्याच्या ठिकाणापर्यंत येत असल्याने आणि तेच शुद्धीकरण करून नाशिकरोडवासीयांना दिले जाते. त्यामध्ये अळ्यामिश्रित पाणी येत असल्याबाबत नाशिकरोड प्रभागातील नगरसेवकांनी अनेकदा लक्ष वेधले.

हे वाचले का?  चार धरणे तुडुंब, नऊमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक साठा, नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ५७ टक्क्यांवर.

या अनुषंगाने महापौरांनी उपरोक्त भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली होती. प्रशासनासमवेत झालेल्या चर्चेत गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते नाशिकरोड येथील जलशुद्धीकरण केंद्रदरम्यान ८०० मिलिमीटर आणि ६०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी २० वर्षांपूर्वी टाकण्यात आल्याची माहिती उघड झाली.

जुनाट जलवाहिनीमुळे गळती, पाइप फुटणे असे प्रकार घडून पाणीपुरवठ्यात अडचण येत असल्याने अळ्यामिश्रित पाणी द्यावे लागत असल्याची बाब समोर आली. महापौरांनी नाशिकरोडसाठी पुढील ३० वर्षांचे नियोजन गृहीत धरून पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनीचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने दोन प्रस्ताव समोर आले.

हे वाचले का?  Video: कसारा घाटात ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलरची पाच मोटारींना धडक, १४ जण जखमी

प्रथम गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकणे आवश्यक असून ते काम हाती घेण्याबाबत सूचित केले. नंतर दुसऱ्याटप्प्यात बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र ते गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याचा विचार करण्यास सुचविले आहे.

या प्रस्तावाला महापौरांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या कामाची प्रशासनाने तातडीने निविदा मागवून नाशिकरोडवासीयांना लवकर शुद्ध पाणी देण्यासाठी कार्यवाही करावी, असे पत्राद्वारे सूचित केले आहे. येत्या वर्षात पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले.