वादविवाद, रखडपट्टी आणि दुप्पट भुर्दंड..

‘फास्टॅग’च्या अंमलबजावणीत टोल नाक्यांवर गोंधळाची स्थिती

‘फास्टॅग’च्या अंमलबजावणीत टोल नाक्यांवर गोंधळाची स्थिती

नाशिक : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर प्रवास करताना फास्टॅग बंधनकारक झाल्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील घोटी, पिंपळगाव आणि शिंदे गावच्या टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. फास्टॅग नसणाऱ्यांकडून दुप्पट पथकर वसुली सुरू झाल्यामुळे टोल नाक्यांवर वाहनधारक आणि टोल कर्मचारी यांच्यात वाद झडले. हे वाद शमविताना पोलिसांची दमछाक झाली. यात कालापव्यय होत असल्याने वाहनधारकांचीही रखडपट्टी झाली. फास्टॅगचा विसर पडलेल्या वाहनधारकांना दुप्पट पथकराचा भुर्दंड सहन करावा लागला.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक देश, एक फास्टॅग हे धोरण लागू केले असून त्याच्या अंमलबजावणीसाठी टोल नाक्यांवर खास नियोजन करण्यात आले होते. कठोर अंमलबजावणीमुळे गोंधळाची शक्यता गृहीत धरून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीदेखील फास्टॅगवरून वाहनधारक आणि टोल कर्मचारी यांच्यात शाब्दीक वाद घडले. मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी येथील टोल नाक्यावर सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या. सर्वच वाहनांना फास्टॅग अनिवार्य असल्याने वाहनचालकांपुढे पेच निर्माण झाला. अनेकांना याबाबतची कल्पना नव्हती.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

फास्टॅगचा विसर पडलेल्यांना दुप्पट टोल भरावा लागल्याने वाहनधारक हतबल झाले होते. फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल वसुलीचा बडगा अमान्य असल्याने टोल कर्मचारी-वाहनधारक वाद दिवसभर सुरू होते. त्यामुळे वादामुळे वाहतूक खोळंबली होती. दुतर्फा गाडय़ांच्या रांगामुळे नागरिक हैराण झाले होते. वाहनधारक-कर्मचारी वाद सोडविताना पोलीस यंत्रणेला कसरत करावी लागली. मुंबई-नाशिक या दोन्ही बाजुकडील वाहनांना टोल नाका पार करण्यास बराच विलंब लागला. स्थानिक वाहनधारकांनाही या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. इगतपुरी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.  पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. घोटी टोल नाक्यातील कोंडीतून कसेबसे निघालेले वाहनधारक पुढे पिंपळगाव टोल नाक्यावर अडकले. फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांना राष्ट्रीय महामार्गावरून मार्गक्रमण करताना मोठा आर्थिक भरूदड सहन करावा लागला. टोल कर्मचारी अरेरावीच्या भाषेत बोलत असल्याची तक्रारी झाल्या. स्थानिकांना फास्टॅगमधून सवलत मिळावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख राजू नाठे यांनी केली. स्थानिकांसाठी टोल नाक्यावर दोन मार्गिका राखीव ठेवाव्यात. टोल कर्मचारी बाहेरचे असतात. ते स्थानिकांना ओळखत नाही. त्यामुळे वाद होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव टोल नाक्यावर वाहनांची गर्दी होती.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

काही वाहनधारकांच्या मते फास्टॅग असूनही यंत्रातून स्कॅनिंग झाले नाही. कित्येक तास मोटार उन्हात उभी राहिल्यास तसे घडत असल्याची साशंकता काहींनी व्यक्त केली. फास्टॅग वाहनांसाठी टोल नाक्यावर स्वतंत्र मार्गिका आहे. तिथे कमी गर्दी पाहून फास्टॅग नसलेली वाहने त्या मार्गिकेत गेली. त्यांना दुप्पट टोल भरावा लागला.