युवक मंडळांनी अपेक्षित काम केले की नाही याची पडताळणी करण्याची कोणती फुटपट्टी वापरली जाणार यावर त्याचे यशापयश अवलंबून राहणार आहे.
विद्याधर कुलकर्णी
मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राज्यभरात आणि राज्याबाहेर देशांतर्गत पाचशे युवक मंडळे स्थापन करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला आहे. या मंडळांनी आठ स्तरांवर काम करणे अपेक्षित असून, एका युवक मंडळासाठी वार्षिक दहा हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. इतक्या अत्यल्प मानधनामध्ये मराठीचा प्रचार आणि प्रसार कसा होणार असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे. त्याचप्रमाणे युवक मंडळांच्या स्थापनेने मराठीचा प्रचार आणि प्रसार खरेच होणार का, हा प्रश्न अनुत्तरितच राहण्याची शक्यता आहे. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार केला याचे मोजमाप करण्याचे मापदंड नाहीत. युवक मंडळांनी अपेक्षित काम केले की नाही याची पडताळणी करण्याची कोणती फुटपट्टी वापरली जाणार यावर त्याचे यशापयश अवलंबून राहणार आहे.
मराठी भाषा युवक मंडळे कशासाठी?
मराठी भाषा बोलणाऱ्यांचा प्रांत या निकषावर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. मराठी भाषेसाठी काम करणारी राज्य मराठी विकास संस्था ही स्वायत्त संस्था आहे. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हे तत्कालीन पुणे विद्यापीठाच्या (सध्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) स्थापनेचे उद्दिष्ट राहिले. त्या बरोबरीने मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी खासगी संस्था आपल्या परीने योगदान देत आहेत. मराठी भाषेसाठी इतक्या पातळीवर काम होत असताना मराठी भाषा युवक मंडळांची स्थापना कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कशी आहे युवक मंडळांची रचना?
मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार या मराठी भाषा विभागाच्या धोरणाशी सुसंगत पारंपरिक पद्धतीने प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विविध माध्यमांद्वारे भाषेच्या प्रचार आणि प्रसारविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी मराठी भाषा युवक मंडळ स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात आणि राज्याबाहेर किमान पाचशे युवक मंडळे निश्चित करताना विद्यापीठातील, शासकीय आणि खासगी मंडळे अशी नोंदणी राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रत्येक युवक मंडळासाठी वार्षिक दहा हजार इतके अनुदान राज्य मराठी विकास संस्थेमार्फत देण्यात येणार आहे, असे या संदर्भात मराठी भाषा विभागाने प्रसृत केलेल्या शासकीय अध्यादेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हे युवक मंडळाचे ध्येय असले, तरी मंडळामध्ये अमराठी भाषकांचाही समावेश करता येईल. मंडळांमधील सभासदांची वयोमर्यादा किमान १८ आणि कमाल ४० वर्षे असू शकेल. युवक मंडळांनी राबविलेले उपक्रम आणि त्याबाबत त्यांनी सादर केलेले पुरावे यांची छाननी करून राज्य मराठी विकास संस्थेमार्फत अनुदानाचा निधी वितरित करण्यात येणार असल्याचे या अध्यादेशामध्ये म्हटले आहे.
युवक मंडळाचे उपक्रम कोणते?
मराठी भाषा युवक मंडळांनी आठ पातळ्यांवर काम करणे अपेक्षित आहे. तशा स्वरूपाची अष्टसूत्री शासकीय अध्यादेशामध्ये नमूद करण्यात आली आहे. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणे, मराठी भाषा गौरव दिन साजरा करणे, वाचन प्रेरणा दिन साजरा करणे, साहित्याची आवड निर्माण होण्यासाठी साहित्यिक, कवी, विचारवंत आणि प्रकाशक यांचा सहभाग असलेल्या चर्चसत्रांचे आयोजन करणे, परिसंवादाच्या विषयामध्ये मराठी रोजगारविषयक कार्यशाळांचा विशेषत्वाने समावेश करण्यात यावा, मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि देवनागरी लिपीच्या जतन-संवर्धनासाठी प्रयत्न करणे, मराठी भाषाविषयक प्रशिक्षण कार्यशाळा, स्पर्धा परीक्षांचे आयोजन करणे आणि अभिनव कल्पनेद्वारे कार्यक्रमांचे आयोजन करणे अशी या मंडळाच्या वर्षभराच्या कामकाजाची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे.
अत्यल्प तरतुदीमध्ये अपेक्षापूर्ती होणार का?
मराठी भाषेचा प्रचार करण्यासाठी मराठी भाषा युवक मंडळ स्थापनेचा निर्णय चांगला असला, तरी त्यासाठी वार्षिक दहा हजार रुपयांची आर्थिक तरतूद अत्यल्प आहे, अशी प्रतिक्रिया अनुबंध प्रकाशनचे अनिल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी भाषा आणि साहित्यावर प्रेम करणारे तळमळीचे कार्यकर्ते असले पाहिजेत. त्याची दक्षता मंडळाची निवड करताना घेतली जावी. कोणताही छोटेखानी कार्यक्रम करायचा असेल, तर सभागृहाचे भाडे, प्रमुख पाहुण्यांचे मानधन यासह विविध गोष्टींसाठी किमान पाच हजार रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे जाहीर करण्यात आलेल्या शासकीय अनुदानामध्ये विविध स्वरूपाचे कार्यक्रम घेणे अशक्य आहे. उद्दिष्ट साध्य करावयाचे असेल, तर मराठी भाषा युवक मंडळांच्या अनुदानामध्ये वाढ करावी लागेल. ते शक्य होणार नसेल तर मराठी भाषा युवक मंडळाच्या संख्येमध्ये घट करून ती मर्यादित ठेवणे योग्य ठरेल, याकडे कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.
विद्याधर कुलकर्णी